मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या आगामी '८३' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक कबीर खानने '८३' चित्रपटासाठी अनेक अभिनेत्यांना कास्ट करत आपली क्रिकेट टीम उभी केली आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरचा '८३'मधील लूक प्रदर्शित करण्यात आला होता. भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या लूकमध्ये रणवीरला पाहण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'८३'मधील एक-एक अभिनेत्याचा लूक रिलीज करण्यात येतोय. आता दाक्षिणात्य अभिनेता जीवा, याचा लूक दिग्दर्शक कबीर खानने शेअर केला आहे. अभिनेता जीवा '८३' चित्रपटात माजी क्रिकेटर कृष्णमचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांची भूमिका साकारत आहे. श्रीकांत यांनी वर्ल्ड कप १९८३च्या फायनल्समध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. श्रीकांत यांना चीका या नावानेही बोलवलं जात होतं. 



जीवाआधी, ताहिर राज भसीनचा लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. '८३' चित्रपटात ताहिर, भारताच्या सुनिल गावस्कर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 



रणवीर सिंह, ताहिर राज भसीन आणि जीवा व्यतिरिक्त '८३' चित्रपटात चिराग पाटील, हार्डी संधू, साहिल खट्टर, साकिब सलीम, दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी आणि इतरही कलाकार भूमिका साकारणार आहेत. 



१९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपवर '८३' चित्रपट आधारित आहे. चित्रपटात दीपिका, कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे. येत्या १० एप्रिल रोजी '८३' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.