Aamir Khan On Power Of Namaste: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या चर्चेत आहे तो नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मुळे! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या कार्यक्रमाच्या नव्या भागामध्ये आमिर खान सहभागी झाला होता. आमिर खान 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटानंतर मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. मात्र 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मुळे तो सध्या चर्चेत असून या कार्यक्रमामध्ये त्याने अनेक किस्से सांगितले. यापैकीच एक रंजक किस्सा ठरला तो 'नमस्कारा'संदर्भात!


अनेक विषयांवर बोलला आमिर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानने 2016 साली प्रचंड गाजलेल्या 'दंगल' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान आपल्याला नमस्कार करण्याची म्हणजेच नमस्ते म्हणत हात जोडून समोरच्याला अभिवादन करण्याची ताकद काय आहे याचा अंदाज असल्याचं म्हटलं. या कार्यक्रमामध्ये कपिल शर्माने आमिरला अनेक विषयांसंदर्भात प्रश्न विचारले. त्यामध्ये आमिरच्या पडलेल्या 'लाल सिंह चड्ढा' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटांसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आले. याच संवादादरम्यान आमिरने त्याच्या धार्मिक मान्यतांबद्दलही भाष्य केलं.


दंगलच्या शुटींगला किस्सा सांगितला


आमिरने मुस्लिम कुटुंबामध्ये संगोपन झाल्याचा उल्लेख एका उत्तरात केला. तसेच पुढे बोलताना त्याने 'नमस्ते'ला किती महत्त्व आहे याचा अंदाज आपल्याला कसा आला याचाही किस्सा सांगितलं. 'रंग दे बसंती' चित्रपटाच्या शुटींगसाठी पंजाबमध्ये गेलेला त्यावेळेच्या आठवणीही आमिरने सांगितलं. "पंजाबी लोक, पंजाबी संस्कृती ही संपूर्णपणे प्रेमाने भरलेली आहे. आम्ही 'दंगल'च्या शुटींगसाठी पंजाबमधील एका छोट्या गावात गेलो होतो. आम्ही तिथे दोन महिन्यांहून अधिक काळ शुटींग केलं. त्याच गावात आणि तेथील घरांमध्ये आम्ही दोन महिने शुटींग करत होतो," असं आमिर म्हणाला.


गावकऱ्यांच्या कृतीने भारावला


"तुमचा विश्वास बसणार नाही पण मी जेव्हा पहाटे 5 किंवा 6 वाजण्याच्या आसपास तिथे यायचो तेव्हा माझ्या कारने एन्ट्री करताच लोक त्यांच्या घराच्या दाराशी उभे राहायचे. ते हे सारं केवळ माझं स्वागत करण्यासाठी करायचे. ते हात जोडून उभे असायचे आणि 'सत् श्री अकाल' म्हणायचे. केवळ माझं स्वागत करण्यासाठी ते वाट पाहत उभे असायचे. त्यांनी कधीच माझ्या कामात व्यत्यय आणायचे नाहीत. ते कधीही माझ्या कारसमोर आडवे आले नाहीत किंवा त्यांच्यामुळे कार थांबवावी लागली नाही. त्यांनी कोणताही त्रास दिला नाही. माझं तेथील शुटींग संपल्यानंतर मी परत जायचो तेव्हा ते पुन्हा त्यांच्या घरांसमोर हात जोडून नमस्कार करत उभे असायचे ते मला शुभरात्री म्हणण्यासाठी," असं आमिरने सांगितलं.


नमस्तेचं महत्त्व कळालं


"मी मुस्लिम कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे. त्यामुळे मला कधीच हात जोडून 'नमस्ते' करण्याची सवय नव्हती. मी हात कपाळाजवळ नेऊन मान खाली करत अभिवादन (मुस्लिमांमध्ये आदाब म्हणत अभिवादन करतात त्याप्रमाणे) करायचो. मी अडीच महिने पंजाबमध्ये राहिल्यानंतर मला 'नमस्ते'चं महत्त्व कळालं. ही फार प्रमाणिक भावना आहे. पंजाबमधील लोकांना सर्वांबद्दल एवढा आदर आणि प्रेम वाटतं की ते लोकांमध्ये भेदभाव करत नाहीत," असंही आमीर म्हणाला.