मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात होणाऱ्या लैंगिक शोषणाविषयी अशा काही चर्चा समोर येत आहेत, ज्या पाहता अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. लोकप्रिय आणि सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचा लेखक चेतन भगत याने सोशल मीडियाचा आधार घेत जाहीर माफीनामा लिहिल्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीने याच संदर्भात जाहीर माफीनामा प्रसिद्ध केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन महिलांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांचा स्वीकार करत त्याने ट्विटरच्या माध्यमातून हा माफीनामा प्रसिद्ध केला. त्या अभिनेत्याचं नाव आहे रजत कपूर. 


पत्रकार संध्या मेनन यांनी सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट पोस्ट केले होते. ज्यामध्ये 'त्या' दोन्ही महिलांनी रजतने आपल्याला दुरध्वनी संभाषणादरम्यान काही अश्लील प्रश्न विचारत आपलं लैंगिक शोषण केल्याचं स्पष्ट केलं होतं.


रजतवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी पहिली महिला ही पत्रकार असून, तिच्यासोबतचा प्रसंग २००७ मध्ये घडला होता. त्यावेळी दुरध्वनी संभाषणादरम्यान, 'तुमचा आवाज जितका मादक आहे तितक्याच तुम्हीही मादक आहात का?' असा प्रश्न विचारत रजतने तिला शरीराची मापंही विचारली होती. 


तर दुसरी महिला ही त्यावेळी सहाय्यक दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत होती. वारंवार तिच्याशी संपर्क साधून रजतने तिच्याकडे एका रिकाम्या खोलीत फिल्मचं चित्रीकरण करण्यात रस दाखवला होता. 


आपल्यावर करण्यात आलेल्या या आरोपांविषयी आता अखेर खुद्द रजतनेच जाहीरपणे माफी मागत झाल्या चुकांसाठी आणि माझ्यामुळे त्यांना झालेल्या मनस्तापासठी मी माफी मागतो, असं ट्विट केलं आहे. 



कामाव्यतिरिक्त जर कोणती महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे एक चांगला माणूस होण्याची. मी एक चांगला माणून होण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. यापुढेही माझा तोच प्रयत्न राहील,  असं म्हणत त्याने माफी मागितली. 


रजतचा हा माफीनामा बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांचं उत्तर ठरु शकतो. असं असलं तरीही तितक्याच नव्या चर्चांना वावही देऊ शकतो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.