Acharya Pramod Krishnam On Kalki 2898 AD : अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि साऊथ स्टार प्रभास (Prabhas) यांचा कल्की 2898 एडी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमाचे कलेक्शन 600 कोटींकडे गेलं असून अनेक मोठे रेकॉर्ड देखील मोडीस निघाले आहेत. एकीकडे सिनेमाची क्रेझ वाढत असून दुसरीकडे मात्र सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांनी सिनेमाचे कलाकार आणि निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चित्रपटात धार्मिक गोष्टींशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकणार का? असा सवाल विचारला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी कल्की 2898 एडी चित्रपटाचे निर्माते, सिनेमातील प्रमुख कलाकार अमिताभ बच्चन, साऊथ इंडियन स्टार प्रभास याच्यासह इतर कलाकारांना देखील कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये कल्की धामचे संस्थापक आचार्य प्रमोद कृष्णम यांनी या चित्रपटाद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. भारत ही भावना, श्रद्धा आणि भक्तीची भूमी आहे. सनातन धर्माच्या मूल्यांशी छेडछाड केली जाऊ नये, असं आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे.


नेमकं काय म्हणाले आचार्य प्रमोद कृष्णम?


भारत हा भावनांचा, विश्वासाचा आणि विश्वासाचा देश आहे. तुम्ही सनातनच्या मूल्यांशी खेळू शकत नाही. सनातनच्या संस्कृती आणि सभ्यतेबरोबरच त्याची शास्त्रेही मोडीत काढू नयेत. भगवान कल्की हा भगवान विष्णूचा शेवटचा अवतार आहे, याचा अर्थ त्यांच्या नंतर कोणताही अवतार होणार नाही. त्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत, त्याचं पालन करत श्री कल्की धामची स्थापना झाली आणि पायाभरणी पंतप्रधान मोदींनी केली, असं आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.


हा चित्रपट आपल्या शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या आणि लिहिलेल्या गोष्टींच्या विरुद्ध आहे. या चित्रपटामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझे काही आक्षेप आहेत ते मी नोटीसमध्ये मांडले आहेत आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे. आम्ही कोणालाही आमच्या सनातन धर्माशी आणि आमच्या शास्त्रांशी खेळू देऊ शकत नाही. हिंदू धर्माच्या भावनांशी खेळणे ही चित्रपट निर्मात्यांची फॅशन झाली आहे. ऋषींना राक्षस म्हणून दाखवले जाते आणि ते इतरांना चांगले मानतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हिंदूंच्या श्रद्धेशी आणि आमच्या शास्त्रांशी खेळता, असं म्हणत आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निर्मात्यांना खडसावलं आहे.



दरम्यान, कल्की चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 70 टक्के कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात तब्बल 414.85 कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली आहे. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 128.85 कोटींची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात 55.85 कोटींची कमाई केली. कल्की चित्रपटाचे 22 दिवसांचे कलेक्शन 599.20 कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी हा चित्रपट 600 कोटींचा टप्पा सहज पार करेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.