मुंबई : अभिनेता चिन्मय मांडलेकर कायमच त्याच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आपली भूमिका आपलं मत स्पष्टपणे मांडण्यासाठी चिन्मयला ओळखलं जातं. नुकतंचं अभिनेत्याने सोशल मीडिया संबधीत मोठं वक्तव्य केलं. चिन्मयने नुकतीच 'अजब गजब' या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिनेत्याने हा खुलासा केला आहे. दिलेल्या मुलाखतीत चिन्मयने सोशल मीडियावर सक्रिय न राहण्यामागचं कारण सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलेल्या मुलाखतीत चिन्मय म्हणाला, ''मी सोशल मीडियावर नाही म्हणून मी काम करतोय. मी पूर्वी होतो. जसं इतरांचं फेसबूक अकाउंट होतं, तसं माझंही होतं. आयुष्यात मला ट्विटर (एक्स) जमलं नाही. कारण मला ती खूप मोठी गटार गंगा वाटते. त्यामुळे मी त्या वाटेला जात नाही. इन्स्टाग्रामवर माझं आता एक अकाउंट आहे. कारण आपण जी काम करतो, चित्रपट म्हणा, मालिका म्हणा किंवा नाटक म्हणा ते प्रमोट करावं लागतं. त्यासंबंधित पोस्टर शेअर करावे लागतात. मी माझ्या एकांकिका किंवा नाटकात एक वाक्य लिहिलं होतं की, जगात काय चाललंय हे आपल्याला कळावं ही पूर्वी माणसाची भूक होती. त्याला आपण म्हणायचो, इंफॉर्मेशन (माहिती). 


''आता आपलं काय चाललंय हे जगाला कळावं त्याला म्हणतात सोशल मीडिया. माझी इच्छा नाहीये, माझं काय चाललंय हे जगाला कळावं. कारण मला नाही वाटतं, मी तितका महत्त्वाचा आहे. मी कुठं जातोय? मी काय करतोय? मी कुठे जेवलो? मी कुठे गेलो? मी काय खाल्लं? माझ्या कुटुंबातील सदस्य काय करतात? हे जगाला कळावं असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या पण आयुष्यात काम आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून दूर असतो.पुढे चिन्मय म्हणाला, ''दुसरं मला हळूहळू जाणवू लागलं. विशेष म्हणजे लॉकडाऊननंतर की, आपल्याला लोकांबद्दल खूप अनावश्यक माहिती कळतं राहते.''


''लोकांची मत काय आहेत? वगैरे. एवढंच नव्हे सोशल मीडियावरच्या भांडणामुळे मी लोकांच्या भल्याभल्या मैत्र्या तुटताना बघितल्या आहेत. माझे इतके मित्र आहेत आणि ते इतक्या भिन्नभिन्न राजकीय विचारसरणीचे आहेत. तरीही ते माझे मित्र आहेत. इतक्या वर्षांचा काळ, दंगली, निवडणूका, या सगळ्या गोष्टी आमची मैत्री तोडू शकली नाही. तर सोशल मीडियामुळे ती तुटू नये म्हणून मी सोशल मीडियापासून लांब आहे आणि ते बरं आहे.''


''जे व्यक्त होणं असतं, ते कुठलाही कलाकार त्याच्या कामातून होतं असतो. खरंच मी म्हणजे काय? माझं काय मत आहे? हे जाणून घ्यायचं असेल तर ‘गालिब’ नाटक बघा. माझं आयुष्याबद्दल काय म्हणणं आहे कळेल. कारण ते माझं नाटक आणि माझं काम आहे. त्याच्यासाठी मला सोशल मीडियावर येऊन पोस्ट लिहिण्याची गरज वाटतं नाही. मत व्यक्त करण्यापेक्षा मत देणं हे महत्त्वाचं आहे. ते मी दर निवडणुकीत न चुकता, व्यवस्थित विचार करून देतो,'' असं चिन्मयने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. चिन्मयचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.