मुंबई : कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 19 मे रोजी ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. हेमंत जोशी यांच्या अशा अचानक जाण्याने छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे. हेमंत जोशी यांनी 'जीव झाला येडापिसा' मालिकेत भावेंची भूमिका साकारली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमंत जोशी यांनी जवळपास दोन दशकं नाटक, सिनेमा आणि मालिकेत काम केलं. नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, तेंडल्या, लायब्ररी, बालगंधर्व सारख्या सिनेमात काम केलं आहे. त्याचप्रमाणे रात्रीस खेळ चाले मालिकेतही ते झळकले होते. 



'जीव झाला येडा पिसा' या मालिकेत हेमंत जोशी यांचा सहकलाकार रोहित हळदीकर याने पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी दिली. या मालिकेतील हेमंत जोशी यांची भावे ही भूमिका अतिशय गाजली. चिन्मयी राघवन या मालिकेत आत्याबाईची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या PA भावेंची भूमिका हेमंत जोशी साकारत होते.


अभिनेता सुप्रित निकमने व्यक्त केल्या भावना


काय लिहू आणि कसं लिहू सुचेना.. हेमंत काका नुकताच "जीव झाला येडपिसा" मधून तुम्ही घराघरात पोहोचला होता. लोक तुम्हाला जोशी कमी आणि जीव झाला मधले भावे म्हणून ओळखायला लागले होते. तुमच्या किती आठवणी सांगू तितकं कमी आहे. मला आठवतो तो जळगाव ते सांगलीचा लांबचा प्रवास. त्या प्रवासात तुम्ही माझ्या सोबत नसता तर कदाचित डिप्रेशन मध्ये गेलो असतो मी. एकाच सिनेमात काम करताना एका निर्मात्याने माझे पैसे बुडवल्याने प्रचंड निराश आणि खचलेला मी आणि मला सावरणारे आणि धीर देणारे तुम्ही. तुमचं ते वाक्य कायमच लक्षात राहील "तुझे ७० हजार बुडाले पण ७० लाखांचा अनुभव घेतलास तू, स्वामी असा अनुभव प्रत्येकाला देत नसतात, डोकं शांत ठेव आणि ऐश कर" आज तुमच्या रूपाने मी माझा एक मित्र हो मित्रच गमावला. कारण वडीलधारी असूनही तुम्ही जवळच्या मित्रा पेक्षा कमी न्हवता. काका तुम्ही नेहमी तक्रार करायचात की मी फोन करत नाही.. आता कुणाला फोन करू..? शेवटचा भेटायचं ही राहून गेलं हेमंत काका. भावपूर्ण श्रद्धांजली हेमंत काका..