Viral Video : कॉन्फिडन्स हवा तर असा... धोतर सुटायला आलं तरीही `भिडू` जॅकी श्रॉफ थांबले नाहीत
कोणत्याही वयोगटातील चाहत्याला हा अभिनेता हवाहवासा वाटतो तो म्हणजे त्याच्या दिलखुलास स्वभावासाठी.
मुंबई : काही कलाकार हे चर्चेत येण्यासाठी कोणतंही कारण गरजेचं नसतं. त्यांच्या नावाभोवती असणारं वलयच प्रसिद्धीचा अंदाज अगदी सहज देऊन जातं. अशाच कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेते जॅकी श्रॉफ यांचं.
जॅकी श्रॉफ हे आता वयाच्या आकड्यानुसार सांगावं तर ज्येष्ठ अभिनेत्यांच्या रांगेत जाऊन बसतात. पण, त्यांचा मनमिळाऊ स्वभाव पाहता, भलेभले त्यांना 'भिडू' बोलण्यापासून थांबत नाहीत.
कोणत्याही वयोगटातील चाहत्याला हा अभिनेता हवाहवासा वाटतो तो म्हणजे त्याच्या दिलखुलास स्वभावासाठी.
जाऊ त्या ठिकाणी श्रॉफ त्यांच्या उत्साही स्वभावानं एक वातावरणनिर्मिती करताना दिसतात.
अशा या अभिनेत्यानं नुकतीच 'इंडियाज गॉट टॅलेंट' (India’s Got Talent) या रिअॅलिटी शोला हजेरी लावली होती.
वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याच भागादरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
जिथं, 'देवदास' या चित्रपटातील गाण्यावर श्रॉफ यांची एंट्री पाहायला मिळते. शुभ्र धोतर, काळ्या रंगाचा झब्बावजा कोट, काळे बूट आणि हो पायात पैंजण अशा हटके लूकमध्ये ते इथं दिसतात.
त्यांची एंट्री पाहून परीक्षकांमध्ये असणारी शिल्पा शेट्टी म्हणताना दिसते, मला तर वाटलं तुमचं धोतर सुटेल... यावर उत्तर देत 'सुटलं असतं... पण ते सांभाळलं' ही बाब त्यांनी उघड केली.
श्रॉफ यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तिथे एकच हशा पिकला. बरं, आजकाल बेल्ट असणारं धोतर वापरलं जातं, असं तिथं असणाऱ्या किरण खेर म्हणाल्या तेव्हा लगेचच आपण नेसवलेलं धोतर वापरल्याचं त्यांनी यावेळी दाखवलं.
एक अभिनेता असण्यासोबत जॅकी श्रॉफ तितकेच कमाल व्यक्तीही आहेत हेच सांगणारा हा आणखी एक व्हिडीओ आहे, असं म्हणायला हरकत नाही.