ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं मुंबईत राहत्या घरी निधन झालं. गेले काही दिवस ते मूत्रपिंडाच्या विकारानं ग्रस्त होते. ते ८४ वर्षांचे होते. मधुकर तोरडमल यांना काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वयोपरत्वे काहीच सुधारणा होत नसल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं मुंबईत राहत्या घरी निधन झालं. गेले काही दिवस ते मूत्रपिंडाच्या विकारानं ग्रस्त होते. ते ८४ वर्षांचे होते. मधुकर तोरडमल यांना काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वयोपरत्वे काहीच सुधारणा होत नसल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं.
शुक्रवारी संध्याकाळपासून ते बेशुद्धावस्थेत होते. मराठी नाट्यसृष्टीत मधुकर तोरडमल हे मामा या नावानं सुपरिचित होते. अभिनयासोबतच लेखक, अनुवादक, निर्माता अशा विविध जबाबदा-या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. त्यांनी लिहिलेलं तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक विशेष गाजलं. या नाटकाचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले.
या नाटकात तोरडमल यांनी साकारलेली प्राध्यापक बारटक्के ही भूमिका विशेष गाजली. लेखक म्हणून त्यांनी कादंबरी, नाटक, चरित्र असे साहित्यप्रकार हाताळले होते. तर अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या कादंब-यांचा अनुवादही त्यांनी केला होता.