VIDEO : लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच मिलिंद सोमणने शेअर केला सुरेख व्हिडिओ
पाहा त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ
मुंबई : प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात, हे सिद्ध करत हिंदी कलाविश्वातील 'आयर्न मॅन' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद सोमण याने अंकिता कोनवार हिच्याशी लग्न केलं. मिलिंद आणि अंकिता विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांच्या या सुरेख प्रवासाला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं. याच निमित्ताने मिलिंदने एक सुरेख व्हिडिओ शेअर केला आहे. लग्नाच्याच काही आठवणींना उजाळा देणाऱ्या या व्हिडिओतून पुन्हा एकदा मिलिंद आणि अंकिताच्या या नात्यातील अविस्मरणीय क्षण पाहण्याची संधी चाहत्यांनाही मिळाली आहे.
२२ एप्रिल, २०१८ ला मिलिंद आणि अंकिता विवाहबंधनात अडकले होते. अलिबाग येथे मित्रपरिवार आणि दोघांच्याची कुटुंबातील खास व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. प्रांत, जात, धर्म आणि वय अशा कोणत्याही सीमांना प्रेमाच्या या वाटेवर वाव न देता मिलिंद आणि अंकिता एकत्र आले होते. त्याच दिवसाला या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा जागवलं जात आहे. बॉलिवूड चित्रपट गीत सुरू असताना मिलिंदच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षण सर्वांचच लक्ष वेधत आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये लग्नविधी आणि संगीत सोहळ्याचीही झलक पाहायला मिळत आहे. अंकिता आणि मिलिंद या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून, कॅप्शनच्या माध्यमातून त्या दोघांनीही एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा या दोघांकडून देण्यात आलेले #CoupleGoals चर्चेचा विषय ठरत आहेत.
अंकिता आणि मिलिंद यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांनीही संपूर्ण कलाविश्वात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. वयात असणारं अंतर पाहता, अनेकांनीच याविषयी आपलं मतप्रदर्शनही केल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, अखेर या सर्व चर्चांना झुगारून लावत ही जोडी विवाहबंधनात अडकली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी प्रेमाची ताकद सिद्ध करत नात्याला एक नवी दिशा दिली.