मुंबई : 'बाहुबली' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला आणि संपूर्ण कलाविश्वात प्रचंड प्रसिद्धी मिळवलेला प्रभास नुकताच साहो, रुपात प्रेक्षकांच्या भेटील आला. सुजित दिग्दर्शित या चित्रपटाची उत्सुकता सुरुवातीपासूनच पाहायला मिळाली होती. पण, प्रदर्शनांतर मात्र 'साहो'ची गाडी रुळावरुन घसरलेली पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीक्षक आणि प्रेक्षकांच्या कुतूहलाची परिसीमा पाहणारा 'साहो' प्रदर्शित झाला. पण, त्याविषयी फार सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या असं नाही. संमिश्र प्रतिसादात या चित्रपटासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गेले, गर्दीही झाली. याला कारण ठरलं ते म्हणजे अभिनेता प्रभासची लोकप्रियता. 



जगभरात जवळपास १० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला साकारण्यासाठी जवळपास ३५० कोटींचा निर्मितीखर्च करण्यात आला. अशा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा १०० कोटींचा आकडा ओलांडला आहे. आंध्र प्रदेशमध्ये या चित्रपटाने ४२ कोटींची कमाई केली, तर तेलंगणामध्ये हे आकडे १४.१ कोटींवर पोहोचले होते. 



'साहो'ची उत्सुकता कितीही असली तरीही 'बाहुबली'चा विक्रम मोडणं मात्र प्रभासला यावेळी जमलेलं नाही. पहिल्याच दिवशी 'बाहुबली'ला २१४ कोटींची धडाकेबाज कमाई मिळाली होती. दरम्यान, 'साहो'च्या हिंदी व्हर्जनला पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई करता आली आहे. मुख्य म्हणजे पहिल्या दिवशी उत्सुकतेचे परिणाम मानले जाणारे हे कमाईचे आकडे आता पुढे किती उंची गाठणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.