`माझ्या मनात सतत...`, `तारक मेहता का उल्टा चष्मा`मधील `टप्पू`ने सांगितलं एक्झिटमागील खरं कारण
अनेकांनी `तारक मेहता का उल्टा चष्मा` या मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि तू ही मालिका का सोडलीस? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने सविस्तर उत्तर दिले.
Raj Anadkat Quit Reason : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कार्यक्रमाला ओळखले जाते. गेल्या 15 वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून राज अनाडकटने ओळखले जाते. राजने या मालिकेत टप्पू हे पात्र साकारले होते. पण काही वर्षांपूर्वी राजने या मालिकेला रामराम केला. आता त्याने हा कार्यक्रम सोडण्याचे कारण सांगितले आहे.
राज अनाडकट हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो त्याच्या व्लॉगद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता राजने त्याच्या नवीन व्लॉगमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. यावेळी त्याला अनेकांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि तू ही मालिका का सोडलीस? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने सविस्तर उत्तर दिले.
"मला खूप काही शिकायला मिळाले"
"'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कार्यक्रमातील माझा अनुभव एका शब्दात सांगायचं झालं तर मी अप्रतिम असे म्हणेन. या कार्यक्रमातून मला खूप काही शिकायला मिळाले. मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. माझ्या या कार्यक्रमासोबत खूप आठवणी आहेत. माझ्या भावना या कार्यक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. मी या कार्यक्रमामुळेच माझी पहिली आंतरराष्ट्रीय सहल करु शकलो. त्यावेळी आम्ही सिंगापूरला गेलो होतो. मी कार्यक्रमामुळे खूप काही कमावलं आहे. त्यामुळेच माझ्यासाठी या कार्यक्रमाचा अनुभव खूपच अद्भूत होता", असे राजने म्हटले.
"...म्हणून मी एक्झिट घेतली"
यानंतर राज अनाडकटने हा कार्यक्रम सोडण्यामागचे कारण सांगितले. यावेळी तो म्हणाला, "माझ्या मनात सतत हा प्रश्न येतो की मी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा कार्यक्रम का सोडला? मी 5 वर्ष हा कार्यक्रम केला आणि जवळपास 1000 पेक्षा अधिक भागात मी झळकलो. हा प्रवास खूपच सुंदर होता. पण मला इतर काही पात्रही साकारायची होती. मला माझ्या करिअरची वाढ हवी होती. मला त्या दिशेने काम करायचे होते. त्यामुळेच मी कार्यक्रम सोडून नवीन प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला. पण मला टप्पू म्हणून स्विकारल्याबद्दल आणि प्रेम दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे. आता मी लवकरच एका नवीन भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे."
"माझी जन्मतारीख चुकीची"
"मी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मी गेल्या 15-16 वर्षांपासून सिनेसृष्टीत आहे. मी 21 वर्षांचा होतो, तेव्हा मी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सहभागी झालो. अनेक पोर्टल्सवर माझी जन्मतारीख चुकीची लिहिली आहे. माझा वाढदिवस 27 डिसेंबरला असतो", असेही राजने यावेळी म्हटले.