मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची दक्षिण मुंबईतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, अभिनेता दुपारी चार वाजता त्याच्या कारमधून क्रॉफर्ड मार्केटसमोरील मुंबई पोलिस मुख्यालयात पोहोचला आणि फणसळकरांची भेट घेतली. सलमान खानने पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचीही भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट असल्याचं कळतयं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्यात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एक पत्र आलं होतं. त्यात या दोघांना पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारलं जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. मुसेवाला याची मे महिन्यात हत्या झाली होती. सलीम खान रोज सकाळी ज्या ठिकाणी फिरायला जायचे त्या ठिकाणी हे निनावी पत्र मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर सापडलं. हे पत्र मिळाल्यानंतर खान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.



दुसरीकडे, काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाजूने उपस्थित असलेल्या एका वकिलाने अलीकडेच दावा केला आहे की, त्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.


तर दुसरीकडे पडद्यावरचा हा चुलबूल पांडे आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आला, तेव्हा तिथं ड्युटीवर हजर असलेले पोलीस कर्मचारी भाईजानच्या प्रेमात पडले... त्यांनी सलमान खानला अक्षरशः गराडाच घातला... त्याच्यासोबत फोटो काढण्यात ते मश्गूल झाले... कुणी ग्रुप फोटो काढले, तर कुणी सेल्फी... सल्लूमियाँ प्रत्येकवेळी हसत हसत फोटोसाठी पोझ देत होता... थँक्यू थँक्यू म्हणत कशीबशी त्यानं पोलिसांच्या गराड्यातून वाट काढली... पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आपले जुने मित्र आहेत.. त्यांचं अभिनंदन करायला आलो होतो, असं सलमाननं यावेळी सांगितलं.