अर्रsss! विश्वविख्यात सायनावर अभिनेत्याची अभद्र कमेंट; पाहा का होतेय अटकेची मागणी
त्याचं व्यक्त होणं फक्त सायनाच नाही, इतरांनाही खटकलं
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाब दौऱ्यामध्ये ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला, त्याचे पडसाद सध्या साऱ्या देशात उमटू लागले आहेत. विविध दृष्टीकोनातून अनेकजण या घटनेवर व्यक्त होऊ लागले आहेत. विश्वविख्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिसुद्धा यात मागे राहिली नाही.
सायनानं सदर घटनेची निंदा करणारी प्रतिक्रिया दिली होती. ज्यावर दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ व्यक्त झाला. पण, सिद्धार्थचं व्यक्त होणं फक्त सायनाच नाही, इतरांनाही खटकलं.
'ज्या देशाच्या पंतप्रधानांच्या संरक्षणात हयगय केली जाते असा देश सुरक्षित असल्याचा दावात करता येणार नाही. मी अतिशय तीव्र शब्दात पंतप्रधानांवरील त्या भ्याड हल्ल्यासक्षम ओढवलेल्या प्रसंगाता निषेध करते (पंजाब घटनेचा).'
असं सायनानं ट्विट करत लिहिलेलं. सायनाच्या या ट्विटवर आपली प्रतिक्रिया देत सिद्धार्थनं अभद्र भाषेचा वापर केल्याचं दिसून आलं.
'... विश्वविजेती... आभार मान की भारताचे संरक्षणकर्ते आहेत', असं सिद्धार्थनं त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं.
या रिकाम्या जागी त्यानं वापरलेले शब्द अनेकांनाच खटकले. सायनानंही त्याच्या वक्तव्यावर आपली नाराजी व्यक्त केली.
'त्याला काय म्हणायचं होतं मला कळलंच नाही. मला तो अभिनेता म्हणून आवडायचा. पण, त्याची ही टीप्पणी मला मुळीच आवडलेली नाही.
चांगली भाषा वापरुनही त्याला आपलं मत मांडता आलं असतं', असं तिनं स्पष्ट केलं.
तिथे सिद्धार्थनंही आपल्या या ट्विटवर स्पष्टीकरण देत त्याचं चुकीच्या पद्धतीनं वाचन करत आशय काढणं गैर आहे असं म्हणत कोणाचाही अवमान करण्याचा हेतू नसल्याची बाब स्पष्ट केली.
सिद्धार्थच्या या ट्विटमुळं हे प्रकरण आणखी तापलं. राष्ट्रीय महिला आयोगाकडून ट्विटर इंडियाला सदर प्रकरणी कारवाई करण्याचं आवाहन देण्यात आलं.
सिद्धार्थचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी त्यांनी केली. तर, नेटकऱ्यांनी तर त्याच्या अटकेची मागणी उचलून धरली.