मुंबई : नाटक, मालिका आणि सिनेमांमधून आपला वेगळा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर हे कॅन्सरने ग्रस्त आहेत. ६७ वर्षीय टॉम अल्टर यांनी ३०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक मालिका आणि नाटकांमध्येही त्यांनी भूमिका गाजवल्या आहेत. मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे. 


टॉम अल्टर हे कॅन्सरच्या चौथ्या स्टेजला असल्याची माहिती समोर आली आहे. टॉम अल्टर यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी थिएटर केलंय, मालिका केल्यात आणि सिनेमेही केलेत. इतकेच नाही तर ते एक चांगले शायर म्हणूनही लोकप्रिय आहेत. ते अभिनयासोबत एक खेळ पत्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. पद्मश्री पुरस्कार मिळालेले टॉम अल्टर यांनीच सचिन तेंडुलकरचा पहिला टिव्ही इंटरव्ह्यू घेतला होता.


अल्टर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, मी राजेश खन्नासोबत अभिनय केलाय, सुनील गावस्कर सोबत क्रिकेट खेळलो, शर्मिला टागोरसोबतही अभिनय केलाय. पटोदी साहेब, मिल्खा सिंह यांना भेटला, दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर यांच्यासोबतही मला काम करण्याची संधी मिळाली. 


टॉम अल्टर यांनी फिल्म अ‍ॅन्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथून १९७४ मध्ये डिप्लोमा केला होता. त्यांना गोल्ड मेडलही मिळालं होतं. त्यांनी तीन पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना भारत सरकारकडून २००८ मध्ये पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.