`दडपशाहीविरोधात कलाकार धाडसाने एकत्र येत नाहीत`
काहींनी याचा चुकीच्या मार्गाने फायदा घेण्यास सुरुवात केली
पुणे : रुपेरी पडदा आणि रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांची मतं मांडली. सेन्सॉरशिपपासून ते सावरकरांच्या नावावरुन सुरु असणाऱ्या वादापर्यंत बऱ्याच मुद्द्यांवर त्यांनी आपले स्पष्ट विचार सर्वांपुढे ठेवले.
गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन जगतात चांगली पकड केलेल्या वेब सीरिजच्या वर्तुळात सेन्सॉरशिप नसल्याचा फायदा आता काहींनी घेण्यास सुरुवात केल्याची बाब त्यांनी मांडली. वैयक्तिक पातळीवर कलावंतांवर होणाऱ्या दडपशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला. 'काहींनी याचा चुकीच्या मार्गाने फायदा घेण्यास सुरुवात केली खरी, पण ती प्रायव्हेट सेन्सॉरशिप नसावी. मुळात सेन्सॉरशिप ही सरकारचीच असावी. प्रायव्हेट सेन्सॉरशिप विरोधात कलावंत धाडसाने एकत्र येत नाहीत', असं ते म्हणाले.
शिवाय अमुक एका विचारसरणीवर आधारित मुद्दे चित्रपटांतून अधोरेखित केले गेल्यास त्यासाठी गोखले यांनी नकारात्मक सूर आळवला. 'जात, धर्म हे वाईटच असून, हे विषच जणू सर्वत्र उगवत आहे. त्यामुळे हे चित्रपटांमध्ये नसावं. कारण, विचारसरणीवर आधारित भेदभाव हा सिने क्षेत्रासाठी हानिकारक ठरणार आहे', असंही सूचक वक्तव्य गोखले यांनी केलं.
योगेश सोमणांवरील कारवाईचं उत्तर सध्याच्या सरकारने द्यावं...
योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर का पाठवलं, याचं उत्तर सध्याच्या सरकारने द्यावं, असा सूर गोखले यांनी आळवला. नाट्यशास्त्राबद्दल सोमण यांनी काही म्हटलं असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. सध्या जे काही चाललय ते अतिशय वाईट आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यामुळे सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. सोमण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. परिणामी त्यांच्यावर ही रजेची कारवाई केली गेली. ज्याचा निषेध गोखले यांनी केला.