Mrunal Thakur Statement On Clothes : सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे लक्झरी आयुष्य जगताना दिसतात. या कलाकारांना महागडे कपडे, घड्याळ, शूज, हिल्स किंवा गाड्यांचा शौक असतो. पण बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जी स्वस्त कपडे परिधान करण्याला पसंती देते. विशेष म्हणजे महागडे कपडे खरेदी करणे म्हणजे पैशांची उधळपट्टी असल्याचे मत तिने व्यक्त केलं आहे. आता ही अभिनेत्री कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठमोळी मृणाल ठाकूर ही हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मृणालने मालिकेत काम करत कलाक्षेत्रात पाऊल टाकलं. त्यानंतर तिने बॉलिवूड गाजवायला सुरुवात केली. आतापर्यंत तिने अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. मृणालने दक्षिणात्य सिनेसृष्टीत देखील स्वतःची एक वेगळी छाप पाडली. मृणालने ‘सिता रामम्’ आणि ‘हाय नन्ना’ या दोन्ही चित्रपटातून दक्षिणेतही तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली. आता लवकरच ती फॅमिली स्टार या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी तिने 'गॅलाटा प्लस'ला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला. 


"कोणत्याही टॉपची किंमत ही 2 हजारपेक्षा जास्त नाही"


"मी कधीही महागड्या डिझायनर कपड्यांवर पैसे खर्च करत नाही. कारण मी ते कपडे एकदा घातले तर मला पुन्हा ते घालावेसे वाटत नाही. मी आताही मुलाखतीदरम्यान जे कपडे घातलेत, ते माझे नाहीत. मी आताच याची ऑर्डर दिली आहे. माझ्या कोणत्याही टॉपची किंमत ही 2 हजारपेक्षा जास्त नाही आणि मला हे देखील जास्तच वाटत आहेत", असे मृणाल ठाकूर म्हणाली.


"जमीन घेऊन त्यात शेती करेन"


"कारण जी गोष्ट महाग आहे, त्याचा वापर तुम्ही पुन्हा पुन्हा करु शकत नाही. तुम्ही तुमच्या कपाटात हटके कलेक्शन ठेऊ शकता. पण फक्त ब्रँड आहे, म्हणून कपडे घ्यायचे हे मात्र मला पैसे फुकट घालवण्यासारखे वाटते. यापेक्षा हे पैसे मी खाण्यात, घर घेण्यात, एखादे झाड लावण्यात किंवा जमीन घेऊन त्यात शेती करण्यात खर्च करेन", असेही तिने म्हटले. 


दरम्यान, मृणाल ठाकूर ही सध्या फॅमिली स्टार या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन परशुराम यांनी केले आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहेत. त्यासोबतच यात जगपती बाबू, अच्युत कुमार, अभिनय, वासुकी, रोहिणी हट्टंगडी, रवि बाबू, दिव्यांश कौशिक, अजय घोष यांसारखे कलाकार झळकत आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.