लग्नाच्या सहा महिन्यांतच नेहा धुपियानं दिला मुलीला जन्म
नेहा धुपिया आणि अंगद बेदीनं अचानक विवाह करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता
मुंबई : अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदी यांच्या घरी एक चिमुकली परी आलीय. रविवारी सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात नेहानं एका मुलीला जन्म दिलाय. आई आणि मुलगी दोघांचीही तब्येत चांगली आहे. नेहाचा पती अंगद बेदी यानं ऑगस्ट महिन्यात नेहा गर्भवती असल्याच्या वृत्ताला होकार दिला होता. त्यानंतर तीन महिन्यांत नेहानं मुलीला जन्म दिलाय.
यापूर्वी नेहानं गर्भवती असताना आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंत नेहा बेबी बंपसोबत पाहायला मिळतेय. 'आणि ही एक नवी सुरुवात, आम्ही तीन' असं कॅप्शन तिनं आपल्या या फोटोला दिलं होतं.
नेहा आणि अंगदनं या वर्षी मे महिन्यात अचानक विवाह करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यनंतर काही दिवसांनीच नेहानं आपण गर्भवती असल्याचाही खुलासा केला होता. नुकतंच 'नो फिल्टर नेहा' या कार्यक्रमात अंगद बेदीनं नेहा विवाहापूर्वीच गर्भवती असल्याचा खुलासा केला होता.
ही गोष्ट कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनाही धक्का बसल्याचं आणि त्यांच्याकडून ओरडा मिळाल्याचं अंगदनं म्हटलं होतं...
याच कार्यक्रमात, नेहा आणि अंगद विवाहापूर्वी एकत्र नेहाच्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते... परंतु, आपण गर्भवती असल्याचं समोर आल्यानंतर नेहानेच अंगदचं सामान घराबाहेर फेकून दिल्याचं समोर आलं होतं. या सगळ्या गोष्टी एका मुलाखतीत अतिशय खेळकर पद्धतीनं सांगत होते.