मुंबई : जवळपास तीन दशकांहून अधिक काळ ऍनिमेशन चित्रपटांमधील मिनी माऊस या गाजलेल्या पात्राला/ कार्टूनला आवाज देणाऱ्या रसी टेलर यांचं शुक्रवारी निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. कॅलिफोर्नियातील ग्लेनडेल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वॉल्ट डिस्नेकडून रविवारी याविषयीचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सांगण्यास अतिशय दु:ख होत आहे की, डिस्ने लेजंड रसी टेलर आपल्यात नाहीत', असं लिहित डिस्नेकडून एक पोस्ट करण्यात आली. १९८६ पासून टेलर यांनी टेलिव्हिजन मालिका, चित्रपट आणि थीम पार्कसाठी मिनी माऊसला आवाज दिला होता. 
टेलर यांच्या निधनानंतर जगभरातील चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं. डिस्ने वाहिनीच्या अध्यक्षपदी असणाऱ्या बॉब आयगर यांनीसुद्धा रसी यांना श्रद्धांजली दिली.


'३० वर्षांहून अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या टेलर यांनी मिनीला जागतिक स्तरावर प्रसिद्धी दिली आणि रसी या स्वत: एक लेजन्ड ठरल्या. ज्यांना डिस्नेच्या प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं', असं ते म्हणाले. टेलर या त्यांच्या कामाच्या माध्यमातून अनेकांसाठी कायमस्वरुपी प्रेरणास्त्रोत ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 



१९८६ मध्ये टेलर यांनी मिनी या पात्राला आवाज देण्यास सुरुवात केली होती. २०० जणांमधून त्यांची निवड करण्यात आली होती. डिस्नेसाठी काम करतानाच त्यांची ओळख वाल्ने एल्वीन यांच्याशी झाली होती. त्यांनी १९७७ मध्ये मिकी माऊस या पात्राला त्यांचा आवाज दिला होता. त्यानंतर, १९९१ मध्ये त्यांनी लग्न केलं. रसी यांनी बऱ्याच इतरही टेलिव्हिजन कार्यक्रमांमधी पात्रांना आवाज दिला आहे. ज्यामध्ये 'टेलस्पिन', 'द लिटिल मर्मेड', 'बल लाईटइयर ऑफ स्टार कमांड' आणि 'द सिम्पस्न्स' यांच्या नावाचा समावेश होता.