अर्रsss लागलं नाही ना... फोटोग्राफरचा तोल जातात अभिनेत्रीच्याही काळजाचा ठोका चुकला
आपल्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडल्याचं पाहून काही क्षणांसाठी ती घाबरली
मुंबई : कलाकार किंवा सेलिब्रिटी असणं तितकं सोपं नसतं हे म्हणतात ते उगाच नाही. ओघाओघानं आलेल्या लोकप्रियतेसोबतच या मंडळींना त्यांचं समाजभानही तितक्याच प्रभावीपणे जपावं लागलं.
सेलिब्रिटींसाठी माध्यमं आणि माध्यमांचे प्रतिनिधीही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात.
जिथं जातील तिथे जाऊन कलाकारांची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकार, जीवाचा आटापिटा करतात. नकळतपणे कलाकारांना हीच मंडळी मोठं करत असतात.
त्यांच्याप्रती आपुलकी दाखवत कलाकारही हे खास नातं जपताना दिसतात.
याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. जिथे आमिर खानची ऑनस्क्रीन मुलगी, म्हणजे अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिनं जबाबदारीनं असं काही केलं की चाहत्यांनीही तिचं कौतुक केलं.
सान्या एके ठिकाणहून बाहेर निघत असताना तिची एक झलक टीपण्यासाठी तिथे काही छायाचित्रकार जमले होते. त्यातील एक मध्यमवयीन व्यक्ती हातात कॅमेरा असानाच अडखळली, आणि त्यांचा तोल गेला.
एका बाजूला ते कलंडले आणि त्यांचे हात जमिनीला लागले, आपल्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडल्याचं पाहून काही क्षणांसाठी सान्या घाबरलीच.
तुम्हाला लागलं नाही ना... असं ती मोठ्या काळजीपोटी त्यांना विचारु लागली. त्यांच्या मदतीसाठी पुढे धावत गेली.
इतकंच नव्हे तर ते नीट उभे राहिल्यानंतर इतर छायाचित्रकारांनी सान्याचे फोटो काढण्यास सुरुवात केली, पण सान्याचं सर्व लक्ष त्या तोल गेलेल्या छायाचित्रकारावरच होतं.
तुम्ही सावरा स्वत:ला असं ती त्यांना म्हणाली आणि चिंतातूर चेहऱ्यानंच कारमध्ये बसली.
सान्याचं हे वागणं अर्थातच सर्वांचं मन जिंकून गेलं आणि या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.