#MeToo २०११ ची मिस इंडिया सयाली भगत आज अमिताभ बच्चन यांच्याविषयी म्हणतेय....
ती आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेली तेव्हा...
मुंबई: #MeToo या चळवळीमध्ये आता हिंदी कलाविश्वात बऱ्याच अभिनेत्री खुलेपणाने बोलू लागल्या आहेत. मुख्य म्हणजे या अभिनेत्रींनी ज्या व्यक्तींवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, त्यांची नावं पाहून अनेकांनाच धक्का बसत आहे. यात सध्या चर्चा सुरु झाली आहे, ती म्हणजे बिग बी अमिताब बच्चन आणि अभिनेत्री सयाली भगत यांच्या नावांची.
सयालीही लैंगिक शोषणाचा शिकार झाल्याचं वावटळ सध्या उठल्याचं दिसत आहे. त्याविषयीच खुद्द सयालीने आता अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार एक जुनं प्रकरण व्हायरल होत असून त्याला सध्याचा संदर्भ जोडण्यात येत आहे.
एका ट्विटर युजरने केलेल्या ट्विटला अनेकांनी रिट्विट केलं. ज्यामुळे या प्रकरणाकडे सोशल मीडियावर बऱ्याच जणांचं लक्ष वेधलं गेलं. पण, ज्यावेळी सयालीशी याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा मात्र तिने हे सर्वकाही चुकीचं असल्याचं म्हटलं.
'मी लैंगिक शोषणाचा शिकार झालेले नाही. पण, सायबर क्राईमचा शिकार नक्कीच झाले आहे. खोटी प्रेसनोट माझ्या नावाने व्हायरल केली जात आहे. आधीसुद्धा अशीच परिस्थिती ओढावली होती. कृपा करुन या प्रकरणाला आणखी हवा देऊ नका. २०११ मध्येच या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. हे सर्व प्रकरण सायबर क्राईमशी जोडलं गेलं होतं. त्यामुळे कृपया अमिताभ बच्चन आणि माझं नाव बदनाम करु नका', असं सयाली म्हणाली आहे.
हे आहे प्रकरण...
'द ट्रेन', 'जेल' या चित्रपटांतून झळकलेल्या माजी मिस इंडिया सयाली हिने २०११ मध्ये एक पत्रक प्रसिद्ध केल्याचं म्हटलं गेलं होतं.
या पत्रकात तिच्या म्हणण्यानुसार, 'द व्हीकेंड' या चित्रपटाच्या लॉन्चदरम्यान अमिताभ प्रमुख पाहुणे होते.
ज्यावेळी ती आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेली तेव्हा बच्चन यांनी चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केल्याचं म्हटलं होतं.
सयालीने आर्य बब्बर, साजिद खान, शायनी अहूजा यांच्यावरही आरोप केले होते असंही म्हटलं गेलं.
दरम्यान, या सर्व प्रकरणाला सायबर क्राईमचा संदर्भ देत सयालीने सर्व दिग्गजांची माफी मागत आपल्य़ा जुन्या प्रकाशकाने कोणत्याही परवानगीशिवाय हे पत्रक प्रसिद्ध केल्याचं तिने म्हटलं होतं.
ज्याप्रकरणी तिने दिलगिरी व्यक्त केली होती. या सर्व गंभीर प्रकरणानंतर तिने खोटं प्रत्रक प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीविषयी तक्रारही दाखल केली होती.