अभिनेत्री शमा सिकंदरला (Shama Sikander) टीव्ही शो 'ये मेरी लाईफ है' सारख्या कार्यक्रमांमुळे ओळखलं जातं. नुकतंच तिने कशाप्रकारे एका अभिनेत्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत होतं याचा किस्सा सांगितला आहे. Bollywood Bubble ला दिलेल्या मुलाखतीत शमा सिकंदरने सांगितलं की, एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान अभिनेत्याने स्क्रिप्टमध्ये बदल केले, जे आपल्यासाठी फार विचित्र होते. 


'जेव्हा त्याने मिठी मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला अस्वस्थ वाटलं'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा शमा सिकंदरला कशाप्रकारे अभिनेत्याने चुकीच्या पद्धतीने मिठी मारली याबद्दल विचारलं तेव्हा तिने कोणाचंही नाव न घेता सांगितलं की, "शूटमध्ये मला मिठी मारण्याचा कोणताही उल्लेख नव्हता. पण त्याला मला काहीही करुन मिठी मारायचं आहे असं वाटत होतं. तुम्हाला काही लोकांकडून येणारी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा समजते. जेव्हा तो माझ्यासह शुटिंग करत होता तेव्हा त्याने स्क्रिप्टमध्ये बदल करत पत्नीच्या (माझ्या) गळ्यात दागिने घालेन असं सांगितलं. यानंतर मी तिला वळवतो आणि मिठी मारतो. जेव्हा त्याने मला मिठी मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो स्पर्श झाल्यावर मला थोडं अस्वस्थ वाटलं. याआधी मला अशी भावना कधी आली नव्हती".


'फारच धक्कादायक आणि विचित्र'


पुढे तिने सांगितलं की, "मी आजपर्यंत अनेक लोकांसह काम केलं आहे. माझे अनेक पुरुष मित्र आहेत, पण त्यांनी कधीही मला असं भासवू दिलं नाही. हे फार धक्कादायक आणि विचित्र होतं. हा माणूस इतका मोठा सुपरस्टार असतानाही असा स्टंट करण्याची गरज काय? असा विचार मी करत होते. माझ्या आयुष्यातील ती फार धक्कादायक घटना होती. मी आयुष्यात पहिल्यांदाच त्याला भेटली होती आणि तो फार गर्विष्ठ वाटत होता. त्याच्याबद्दल काही सामान्य वाटत नव्हतं. जरी मी उद्या मोठी सुपरस्टार झाले तरी आयुष्यात कधीही त्याच्यासोबत काम करणार नाही".


बॉलीवूडमधील कास्टिंग काऊचबद्दल विचारलं असता, शमाने एका मोठ्या चित्रपटात काम सुरू केल्याची आणि काही भाग शूट केल्याची आठवण सांगितली. मेकअप केलेला असताना शेवटच्या क्षणी तिला शूट रद्द झाल्याचं सांगण्यात आले. तिने सांगितले की ती एका 'खूप मोठ्या स्टार'सोबत काम करत होती, जो शूटसाठी आला नाही.


ती निघत असताना दिग्दर्शकाने दुसऱ्या अभिनेत्रीला या भूमिकेसाठी निवडल्याचं सांगितलं. मला धक्का बसला होता आणि रात्रभर रडत होते अशी माहिती तिने दिली. अभिनेत्यांना रातोरात प्रोजेक्टमधून काढून टाकणं हे फिल्म इंडस्ट्रीत नित्याचं आहे असंही ती म्हणाली.