शमिता शेट्टीच्या गाडीला धडक; ड्रायव्हरलाही मारहाण
राबोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि रिऍलिटी शोची स्पर्धक शमिता शेट्टीसोबत गैरवर्तवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा शमिता शेट्टीच्या कारला ठाण्यातील विवियाना मॉलजवळ एका मोटरसायकलने धडक दिली. मोटरसायकलवर असणाऱ्या तीन जणांनी शमिताच्या ड्रायव्हरला मारहाणही केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शमिता शेट्टीच्या ड्रायव्हरने राबोडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ड्रायव्हरने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शमिताच्या ड्रायव्हरने, त्या तीन जणांनी त्याला कानाखाली मारली आणि धमकी दिल्याचे सांगितले. भारतीय दंड संहितेच्या कलम २७९, ३२३, ५०४, ५०६, ४२७ आणि ३४ अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.