मुंबई : 
दिग्दर्शन : अनुभव सिन्हा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाकार: तापसी पन्नू, पावैल गुलाटी, रत्ना पाठक शाह, कुमूद मिश्रा, माया सराओ, तन्वी आझमी, गीतिका विद्या, मानव कौल 


साचेबद्द भूमिकांना दूर सारत काही आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री तापसी पन्नू 'थप्पड' या चित्रपटातून याच साचेबद्धतेला शह देताना दिसत आहे. प्रत्येक वेळी नव्या गोष्टींच्या कलाने जात असताना काही जुन्या गोष्टींमध्येही अमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. याच मनसुब्याने अनुभव सिन्हाने Thappad हा चित्रपट साकारला आहे. चित्रपटाच्या कथानकाला जीवंतस्वरुप देण्यासाठी त्याला अतिशय दर्जेदार कलाकारांची साथ मिळाली आहे. 


Thappad मध्ये 'अमृता'च्या भूमिकेत दिसणारी तापसी एका सर्वगुणसंपन्न सुनेच्या, पत्नीच्या रुपाच दिसते. सहचारिणी म्हणून ती जितकी तत्पर असते तितकीच एक सून म्हणून जबाबदारीनेही वागत असते. एकंदरच 'परफेक्ट बहू' ही संकल्पना तापसीसाठी अतिशय योग्य वाटत असतानाच चित्रपटाच्या कथानकाला एक नवं वळण मिळतं. 


एका हाऊस पार्टीमध्ये नोकरीच्या मुद्द्यावरुन चीडचीड करणारा विक्रम (Pavail Gulati) 'अमृता'ला (Taapsee Pannu) एक चपराक मारतो. पतीला चारचौघात गैरवर्तन करण्यापासून रोखू पाहणाऱ्या अमृताला तिच्या कृतीबद्दल मिळालेली चपराक ही तिला हादरवून सोडते. ही साधीसुधी चपराक नसून पतीसोबतच्या नात्यात आलेल्या दुराव्याची, मतभेदांची, अपमानाची चाहूल असते. परिणामी स्वत:च्या अस्तित्वाखातर 'अमृता' तिच्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेते. 


आई  (Ratna Pathak Shah), सासू या दोघीसुद्धा तिला या निर्णयाचा पुनवर्विचार करण्याचा सल्ला देत झाल्या गोष्टी विसरण्याचा सल्ला देऊ पाहतात. एक स्त्री आणि तिच्या वाट्याला येणाऱ्या गोष्टी कशा प्रकारे बदलल्या जाऊच शकत नाहीत, हे पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मुळात दैनंदिन जीवनातीलच हे एक उदाहरण, जिथे अनेकदा 'जाऊ दे गं... हे असंच असतं....', असं म्हणत कित्येक गंभीर मुद्दे दुर्लक्षितच ठेवले जातात. या साऱ्या अडथळ्यांच्या आणि कठीण प्रवासाच तिला साथ मिळते ती म्हणजे समजुतदार वडिलांची. एक पुरुषही समाजातील काही गोष्टींमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणण्यासाठी किती महत्त्वाची आणि जबाबदारीची भूमिका बजावतो, हे दिग्दर्शकाने चित्रपटातून सुरेखपणे मांडलं आहे. 


अमृताच्या जीवनातील प्रसंग सुरु असतानात त्याच सोबतीने चित्रपटातील प्रत्येक पात्राचा एक व्यक्ती म्हणून होत असणारा प्रवासही उलगडू लागतो. परिस्थिती, त्यावर व्यक्त होण्याची त्यांची पद्धत, प्रतिक्रिया हे सारंकाही प्रत्येक क्षणी आपल्यालाही विचार करण्यास भाग पाडतं. आपणही अशीच कोणी अमृता पाहिली असेल जिने आपल्याला तिच्याविषयी सांगितल्यानंतरही तू बोलून गोष्टींवर तोडगा काढ वाद नको, असेच कैक सल्ले तिलाही मिळाले असतील. पण, खरंच ही बाब बोलून तोडगा काढण्याइतकी लहान आहे का? 



घरगुती हिंसा, किंवा मग महिलेवर हात उगारणं ही बाबच मुळात साधीसुधी नाही हे यापुढे लक्षात ठेवलं गेलंच पाहिजे हाच मुद्दा  दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच अतिशय प्रभावीपणे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी त्यांचा स्वाभिमानही तितकाच महत्त्वाचा असतो, हे सांगताना चित्रपटाचं कथानक कुठेही रटाळ वाटत नाही. ते अतिरंजिकही करण्यात आलेलं नाही. नात्यांमध्ये येणारी तेढ नाही, उगाचचे बिनकामी संवाद नाहीत. पण, जे संवाद आहेत. ते मात्र इतके वास्तववादी की, कलाकारांच्या तोंडून ऐकताना आपणंही अशा चुका करत नाही ना, हा प्रश्न मनात जावून जातात. 


चित्रपटात कुठेच उथळपणा दिसत नाही. प्रत्येक दृश्याची एकमेकांशी असणारा संबंध आणि त्यातून उलगडणारा अमृताचा प्रवास अशा कित्येक अमृतांसाठी प्रेरणादायी असेल. मुळात तो प्रेरणादायी असण्यापेक्षा त्यांच्या मनातील तगमगीला वाचा फोडणारा ठरत आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्र हे तितकंच महत्त्वाचं आहे, तर चित्रपटातील संगीतही कुठेच अतिशयोक्तीचं वाटत नाही. एक अभिनेत्री म्हणून तापसीने  पुन्हा एकदा नवा पायंडा घातला आहे. त्यामुळे तिने साकारलेली अमृता ही काही सहजासहजी विसरता येणारी नाही हे खरं. थप्पडची कथा, वास्तवाशी असणारं त्याचं नातं पाहता ही अमृता आणि ही थप्पड विचारांच्या झिणझीण्या आणतेय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


या दमदार चित्रपटाला 'झी२४तास'कडून चार स्टार