मुंबई : २०१८ साली उदयास आलेला #metoo हा वाद अद्यापही शमलेला नाही. अभिनेत्री तनुश्री दत्ताने या अंदोलनाला सुरूवात केली होती. हा वाद न्यायालयाच्या चौकटीवर देखील पोहोचला होता. वकिल नितीन सातपुते यांच्या खांद्यावर या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी होती. पण आता चक्क एका महिलेने त्यांच्या विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपमानजनक भाषेचा वापर करत छेडछाड केल्याची तक्रार महिलेने वांद्रे पोलिसात केली आहे. नितीन सातपुते हे नाना पाटेकर यांच्याविरोधात तनुश्री दत्ताचे वकिल आहेत. ही घटना महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेरील असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. 



मुलांसाठी बाग निर्माण करण्यावरून पीडिता आणि सातपुतेंचा २ नोव्हेंबर रोजी वाद झाला होता. त्यानंतर सातपुतेंनी फोनवर आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यामुळे ४७ वर्षिय महिलेने त्यांच्या विरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडितेने ४ नोव्हेंबर रोजी राज्य महिला आयोगात याबाबत तक्रार केल्याचे देखील अधिकाऱ्याने सांगितले. 


त्यानंतर पीडितेला राज्य महिला आयोगाने बैठकीसाठी बोलावलं होतं. पण कार्यालयातून बाहेर पडताना जवळ येवून अपमानजनक भाषेचा वापर केल्याचा महिलेचा आरोप आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 


मुळ अमेरिकेत उदयास आलेली #metoo ही चळवळ तनुश्रीने भारतात उदयास आणली. तिने जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी छेडछाडीचा आरोप केला होती. पण नाना पाटेकर  यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. अद्यापही न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे.