मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात आता बॉलिवूड कलाकारही पुढे येत आहेत. काँग्रेसची माजी सदस्य आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीदेखील सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. गुरूवारी त्यांनी सीएएची तुलना ब्रिटिश सरकारच्या रोलेट कायद्यासोबत केली आहे. पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'१९१९ साली दुसरं महायुद्ध संपल्यानंतर इंग्रजांना कल्पना होती की भारतीयांच्या मनात असंतोष पसरत आहे आणि हा असंतोष एक दिवस बाहेर निघेल. म्हणून त्यांनी एक कायदा आणला होता. त्या कायद्याला रोलेट कायदा असं नाव देण्यात आला होतं. १९१९ चा रोलेट कायदा आणि २०१९चा सीएए कायदा इतिहासातील काळा कायदा म्हणून ओळखला जाईल.' असं उर्मिला म्हणाल्या. 



यावेळेस १९१९ साली दुसरं महायुद्ध संपलं असं वक्तव्य उर्मिला यांनी केलं. तर दुसरं महायुद्ध १९३९ पासून ते सप्टेंबर १९४५ पर्यंत सुरू होतं. तर पहिलं महायुद्ध जुलै १९१४ ते नोव्हेंबर १९१८ पर्यंत सुरू होतं. रोलेट कायदा १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने मंजूर केला होता. या वक्तव्यानंतर उर्मिला मातोंडकर यांना ट्रोल केले जात आहे.


उर्मिला मातोंडकरप्रमाणेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. यात अनुराग कश्यप, तापसी पन्नूस ऋचा चड्ढा, अली फजल, विशाल भारद्वाज, झोया अख्तर, अनुभव सिन्हा, स्वरा भास्कर यांचा समावेश आहे.