मुंबईः दिग्दर्शक ओम राऊतचा बहुचर्चित चित्रपट 'आदिपुरुष' शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. मात्र, चित्रपट रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील संवाद, व्हिएफएक्स, कलाकारांचा लूक यावरुन प्रेक्षकांसह समीक्षकांनीही चित्रपटांवर टीका केली आहे. तर, सोशल मीडियावरही चित्रपटाचा विरोध होत आहे. भारताबरोबरच नेपाळमध्येही आदिपुरुषचा विरोध होताना दिसत आहे. चित्रपटातील एका संवादामुळं चित्रपट नेपाळमध्ये प्रदर्शित होऊ देणार नसल्याची भूमिका तेथिल थिएटर मालकांनी घेतली आहे. 


नेपाळमध्ये विरोध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदिपुरुष चित्रपट 16 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. 500 कोटींचे बजट असलेला हा सिनेमा मात्र प्रेक्षकांची वाहवा मिळवू शकला नाही. चित्रपटातील अनेक मुद्दे प्रेक्षकांना खटकले आहेत. तसंच, व्हिएफएक्सवर दिग्दर्शकाने आणखी मेहनत करण्याची गरज होती, असंह काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे. भारतापाठोपाठ नेपाळमध्येही चित्रपटाचा विरोध करण्यात येत आहे. चित्रपटातील काही संवादावर नेपाळ सरकारने आक्षेप घेतला आहे. जोपर्यंत हे संवाद चित्रपटातून हटवण्यात येत नाहीत तोपर्यंत चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, असा इशारा नेपाळमधील थिएटर मालकांनी दिला आहे. 


'त्या' संवादावर आक्षेप


आदिपुरुष चित्रपटात सीता मातेला भारत की बेटी असं म्हणण्यात आलं आहे. चित्रपटात एक संवाद आहे त्यात 'जानकी भारत की बेटी है', असं म्हणण्यात आलं आहे. याच संवादावर नेपाळने तीव्र आक्षेप घेतला आहे. काठमांडू मेट्रोपॉलिटियन सिटीचे महापौर यांनी चित्रपटातून हा संवाद हटवण्याची मागणी केली आहे. जनकपूर हे सीता मातेचे माहेर मानले जाते, सध्या जनकपुर नेपाळमध्ये आहे. त्यामुळं सीता नेपाळची कन्या असावी, असं त्यांनी म्हटलं आहे. 


शहा यांनी सोशल मीडियावर ट्विट करुन निषेध व्यक्त केला होता. काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये कोणत्याही हिंदी चित्रपटाला परवानगी दिली जाणार नाही. आदिपुरुष चित्रपटातील चूक दुरुस्त करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, नेपाळच्या इशाऱ्यानंतर तो संवाद चित्रपटातून काढून टाकण्यात आला आहे. 


आदिपुरुषला वाढता विरोध


आदिपुरुषविरोधात संपूर्ण भारतात नाराजी व्यक्त केली जात आहे. निर्माता ओम राऊत, प्राभास, सैफ अली खानसह पाच जणांविरोघात २०२२मध्ये पहिल्यांदा उत्तरप्रदेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबईतही आता चित्रपटाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रामचरित मानस म्हणजेच रामायणातील पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहेत. हिंदू धर्मातील भाविकांच्या भावना दुखावल्या जातील असे संवाद व दृष्य चित्रपटात आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे.