ड्रग्स प्रकरणी भारती पाठोपाठ तिच्या पतीलाही अटक
घराणेशाही, गटबाजी आणि त्यानंतर चर्चेत आलेल्या ड्रग्स प्रकरणामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या गोष्टींचा खुलासा होत आहे. घराणेशाही, गटबाजी आणि त्यानंतर चर्चेत आलेल्या ड्रग्स प्रकरणामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी आतापर्यंत अनेक बड्या कलाकारांना एनसीबीच्या चौकशीचा सामना करावा लागला आहे. तर ड्रग्सच्या जाळ्यामध्ये आता कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष देखील सापडला आहे. दरम्यान ड्रग्स बाळगल्या प्रकरणी भारतीला शनिवारी अटक करण्यात आली. आता तिचा पती हर्षला देखील अटक करण्यात आली आहे.
एएनआयच्या ट्विटनुसार, कॉमेडियन भारती सिंगचा पती हर्षला देखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. . ड्रग्जच्या पेडलर्सकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियनच्या भारती सिंहच्या घरी एनसीबीने धाड टाकली होती.
एनसीबी त्यांचा घरात आणि कार्यालयात धाड टाकल्यानंतर ८६.५ ग्रॉम ड्रग्स जप्त करण्यात आला आहे. शिवाय गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दोघांनी दिली आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघांवरही ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, ड्रग्स प्रकरणी याआधी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर निर्माता फिरोझ नाडियादवालाची पत्नी शबाना यांना देखील अटक करण्यात आली होती. तर याप्रकरणी अनेकांचे जबाब देखील नोंदवले गेले आहेत.