मुंबई : १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोक सागरात बुडाला आहे. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. देशभरात संतापाचे वातावरण पसरले आहे. लोकांकडून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत धडा शिकवण्याची मागणी करण्यात येत आहे. माजी क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू यांनी पुलवामा हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे लोकांकडून 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धू यांना काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द कपिल शर्मा शो'मध्ये प्रमुख भूमिकेत असणाऱ्या नवजोत सिंह सिद्धू यांना शोमधून बाहेर काढण्याची मागणी इतकी तीव्र होत आहे की लोकांनी असं न केल्यास कपिलचा शो बंद करण्याची चर्चा होत आहे. कपिल शर्माच्या शोमधून सिद्धू यांना बाहेर काढण्यासाठी सोशल मीडियावर विविध पोस्ट केल्या जात असून अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. कपिल शर्मा व्यतिरिक्त सोनी इंटरटेनमेंटकडेही सिद्धू यांना बाहेर करण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी इतकी तीव्र होत आहे की ट्विटरवरही #boycottsidhu हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.


या भयंकर हल्ल्यानंतर नवजोत सिंह सिद्धू यांनी 'ही अतिशय दुखद घटना आहे. परंतु यावर चर्चा करून या समस्येवर मार्ग काढला पाहिजे. आपल्याला अतिशय शांतपणे काम केलं पाहिजे. ज्या लोकांनी ही कृत घडवलं आहे त्यांना शिक्षा मिळायला हवी' असं सिद्धू यांनी सांगितलं. 






 



सिद्धू यांनी पाकिस्तानात इमरान खानचे कौतुक करत आता भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांत सुधारणा होण्यास सुरूवात होईल असं म्हटलं होतं.