मुंबई : धर्मा प्रॉडक्शनच्या 'राझी' या सिनेमात पाकिस्तानी गृहिणी 'मुनिरा'च्या भूमिकेत दिसलेली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच डिजीटल विश्वात पाऊल टाकणार आहे. 'मुनिरा'च्या भूमिकेला फक्त चाहत्यांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही दाद मिळाली. अमृता दिसायला सुंदर आहेच पण ती एक चांगली अभिनेत्रीही आहे, हे आता लोकांच्या लक्षात आलंय. 'मुनिरा'च्या भूमिकेमुळे आता अमृताला बॉलीवूडची कवाडं खुली झालीत. 'राझी'च्या शालीन आणि घरंदाज गृहिणीनंतर आता अमृता आपल्या चाहत्यांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृताने आपल्या आजवरच्या करीयरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे.


अमृताचा डिजिटल डेब्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृताचा लवकरच डिजिटल दुनियेत डेब्यू करतेय. तिच्या नव्या वेबसीरिजमध्ये असलेली ही तिची भूमिका रहस्यमय स्वरूपाची आहे. अमृता सध्या यश चाखतेय... यश प्राप्त झाल्यानंतर अर्थातच कलाकारांना अष्टपैलू भूमिका करण्याची इच्छा असते. अमृता नुकतीच एका घरंदाज गृहिणीच्या भूमिकेत राजीमध्ये दिसली होती. त्यानंतर ती आता एका बोल्ड आणि हिंसक भूमिकेत दिसेल.  


अमृता नव्या वेबसीरिजमध्ये 

लवकरच सुरू होणाऱ्या या वेबसीरिजचं नाव अद्याप समजलं नसलं तरी त्यात अमृता प्रमुख भूमिकेत दिसेल, हे नक्की... याविषयी अमृता सांगते, 'मला करीयरच्या ह्या वळणावर विविध प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा आहे. रूढिबध्द भूमिका न करता काहीतरी वेगळं करण्याची आणि त्यासाठी कोणत्याही कसोटीवरही माझी उतरण्याची तयारी आहे. माझी ही नवी भूमिकाही माझी कसोटी पणाला लावणारी आहे.'
 
ब्लॉकबस्टर 'राझी' चित्रपटातल्या मुनिरा भूमिकेमुळे अमृताचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं. याविषयी ती सांगते, "मला अजूनही भरभरून प्रतिक्रिया मिळतायत. या भूमिकेसाठी मी घेतलेली मेहनत कामी आल्याचा आनंद वाटतोय. माझे चाहते, फिल्मइंडस्ट्रीतली मित्र-मंडळी ह्यांच्याकडून पाठ थोपटली जातेय, त्यामूळे आता अजून जबाबदारीने काम करायची जाणीवही मला होतेय'


नवी भूमिका... नवं आव्हान


अमृताच्या नव्या वेबसीरिज विषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच असली तरीही, सूत्रांच्या अनुसार, अनेक खून केल्याचा आरोप असलेल्या अपराध्याच्या भूमिकेत अमृता यात दिसणार असल्याचं समजतंय. आपल्या भूमिकेविषयी अमृता म्हणते, 'या भूमिकेत मी तुम्हाला ग्रे-शेड्समध्ये दिसेन. ही एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. जिचं आयुष्य आणि त्यातले निर्णय खूप बोल्ड आहेत. मला आनंद आहे, की राजीनंतर आता मला अशा भूमिका ऑफर होउ लागल्यात. आज सिनेक्षेत्रात अशा कथांची आणि अशा भूमिकांची खूप गरज असल्याचं मला वाटतं'.