`ठाकरे`नंतर `मणिकर्णिका`लाही पायरसीचा फटका
इंटरनेटवर चित्रपटांना पायरसीचा फटका
मुंबई : कंगना रानौत स्टारर 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. कंगणाच्या या चित्रपटाला चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्या तरी प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मोठी पसंती मिळत आहे. पहिल्याच दिवशी 'मणिकर्णिका...'ने बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला जमवला. परंतु तमिळ रॉकर्स या वेबसाईटने चित्रपट रिलीज झाल्याच्या एक दिवसाच्या आतच चित्रपटाची संपूर्ण फीत ऑललाईन लीक केली आहे.
इंटरनेटवर चित्रपट लीक होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. 'मणिकर्णिका...' ऑनलाईन लीक झाल्यामुळे पहिल्या दिवसानंतर बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्यामुळे याचा मोठा फटका निर्मात्यांना बसत आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिंदीसह तामिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झाला.
'तमिलरॉकर्स' वेबसाईटने मणिकर्णिका व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'ठाकरे', विक्की कौशलचा 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक', 'द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर', रजनीकांत यांचा 'पेटा' आणि 'विश्वासम' हे चित्रपटही ऑनलाईन लीक केले होते.
TamilRockers.com ही पायरसी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर अनेक भाषेतील चित्रपट लीक केले जातात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पोलिसांनी Tamilrockers वेबसाईट चालवणाऱ्या काही लोकांना अटक केली होती. मात्र या कारवाईनंतरही वेबसाईटवर अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट लीक होण्याचे सत्र सुरूच आहे.