मुंबई : लोकप्रिय मालिका 'अग्निहोत्र' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2008 च्या नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित झालेली 'अग्निहोत्र' ही मालिका तब्बल 10 वर्षांनी 'अग्निहोत्र 2'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाडा, आठ गणपती आणि त्याभोवती फिरणाऱ्या कथानकातून एकत्र आलेल्या अग्निहोत्रींच्या तीन पिढ्या प्रत्येकाला गूढत्वाकडे घेऊन गेल्या. या मालिकेने एक इतिहास रचला आहे आणि आता पुन्हा एकदा नवा इतिहास रचण्यासाठी ही मालिका रुपेरी पडद्यावर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2008 मध्ये देखील ही मालिका नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झाली होती. आता 10 वर्षांनी देखील ही मालिका 2019 मध्ये 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाचे कथानक श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले असून ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख दिग्दर्शक सतीश राजवाडे स्वत: या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. 



अग्निहोत्र मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली होती. नुकताच वाहिनीनं एक प्रोमो शेअर केला आहे. यात अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत. अग्निहोत्रच्या नव्या पर्वात शरद पोंक्षे यांची भूमिका कायम राहणार आहे.



शरद पोंक्षे यांनी अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वात महादेव ही व्यक्तिरेखा साकारली होती. मालिकेनं शेअर केलेल्या प्रोमोत अग्निहोत्र्यांचा वाडा, गणपतीचं मंदिर आणि मंदिरासमोर बसलेले महादेव अग्निहोत्री यांची एक झलक पाहायला मिळते. शरद पोंक्षेंनी कर्करोगावर यशस्वीपणे मात करत पुन्हा कलाविश्वात पुनरागमन केलं आहे. गेल्या डिसेंबरपासून ते कर्करोगावर उपचार घेत होते. औषधोपचार आणि किमोथेरपीनं त्यांनी कर्करोगावर मात केली आहे. सध्या ते 'हिमालयाची सावली' या नाटकात काम करत आहेत.