....आता तोच आशेचा किरण; बिकट परिस्थितीत मदतीसाठी अभिनेत्याची सलमानला हाक
आर्थिक मदतीसाठी सलमानपर्यंत पोहोचण्याचा लोकप्रिय अभिनेत्याचा प्रयत्न
मुंबई : 'कुछ रंग प्यार के ऐसे भी'मधून झळकलेल्या अभिनेता आशिष रॉय यांनी काही दिवसांपूर्वी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्याला उपचारांसाठीच्या खर्चासाठी आर्खित मदत हवी असल्याची माहिती दिली. एकेकाळी लोकप्रिय मालिकांमधून झळणाऱ्या रॉय यांची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांच्यासाठी काहींनी मदतीचा हातही पुढे केला.
मुंबईतील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या या अभिनेत्याची परिस्थिती अतिशय बिकट असल्याची माहिती सूत्रांचा हवाला देत माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आता आशिष यांच्या मदतीसाठी थेट अभिनेता सलमान खान याचं दार ठोठावण्यात आल्याची माहिची समोर येत आहे.
माध्यमांशी संवाद साधताना आशिष यांच्याकडूनच ही माहिती मिळाली. 'सोशल मीडियावर बँक खात्याचा तपशील देऊनही मला अपेक्षित आर्थिक मदत मिळाली नाही. सूरज थापर या माझ्या मित्रानंही मला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण, लॉकडाऊनमुळं मात्र त्याचेही हात बांधले गेले आहेत. त्यामुळे आता सलमान खान हाच आता माझ्यासाठी एक आशेचा किरण ठरत आहे. सूरजने सलमानसोबत काम केल्यामुळं आता आम्ही त्याच्यायपर्यंत पोहोचून मदत मागण्याच्या प्रयत्नांत आहोत. बिइंग ह्युमन या त्याच्या संस्थेकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे', असं आशिष म्हणाल्याचं वृत्त 'स्पॉटबॉय ई'ने प्रसिद्ध केलं.
सर्वांनाच मदत करण्यासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाईजान सलमानपर्यंत आता आशिषचा आवाज पोहोचतो का आणि पोहोचल्यास सलमान त्याला नेमकी कशी मदत करतो याकडेच आता अनेकांचं लक्ष असेल.