कॅनडाचा पासपोर्ट असला तरी मला देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही - अक्षय कुमार
`माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, ही गोष्ट मी कधीही नाकारली नाही...`
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं आपल्या नागरिकत्वाच्या मुद्यावर सुरू असलेल्या चर्चांना शुक्रवारी उत्तर दिलंय. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, ही गोष्ट मी कधीही नाकारली नाही... परंतु, माझ्या नागरिकत्वाच्या मुद्यावर दुष्प्राचार केला जातोय, असं अक्षय कुमारनं उद्विगतेनं म्हटलंय. काही दिवसांपूर्वी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक 'अराजकीय' मुलाखत घेतली होती. त्यानंतर, पुन्हा एकदा अक्षयच्या नागरिकत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता.
'मी माझ्या नागरिकत्वाबद्दल कधीही काहीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. गेल्या सात वर्षांपासून मी कॅनडाला गेलेलो नाही. मी भारतातच राहतो आणि कायदेशीररित्या करही भरतो. भारताला आणखीन मजबूत बनवण्यावर माझा विश्वास आहे' असं अक्षयनं म्हटलंय.
कामाच्या बाबतीत बोलायचं तर अक्षय कुमार लवकरच दाक्षिणात्य सुपरहिट फिल्म 'कंचना'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि कियारा आडवानीही त्याच्यासोबत असतील. 'कंचना'च्या हिंदी रिमेकचं नाव 'लक्ष्मी बॉम्ब' ठेवण्यात आलंय. 'कंचना' हा सिनेमा राघव लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला होता. आता हिंदी सिनेमाही ते स्वत:च दिग्दर्शित करत आहेत.