मुंबई : वेडिंग फोटोग्राफीमागोमाग आता ध्यानधारणा करत असतानाचे फोटो काढण्याचाही ट्रेंड येणार, ही एक मोठी गोष्ट सिद्ध होणार अशा आशयाचं ट्विट करत अभिनेत्री, लेखिला ट्विंकल खन्ना हिने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिचं हे ट्विट आता नेमकं कोणासाठी आहे, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडलाही नसावा. कारण, ट्विटसोबतचा फोटो पाहता लगेचच तिच्या म्हणण्याचा रोख हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचं लगेचच लक्षात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. केदारनाथ इथे गेले असता, त्यांनी एका गुहेत ध्यानधारणाही केली. वृत्तसंस्थांपासून ते इतर सर्वच माध्यमांमध्ये मोदींच्या या ध्यानधारणा करतानाचे फोटो व्हायरल झाले. केशरी रंगाचे वस्त्र  आणि चेहऱ्यावर कोणतेही शांत भाव असलेल्या मोदींच्या ध्यानधारणेचे हे फोटो सोशल मीडियावर अनेक चर्चांना वाव देऊन गेले. त्यातच ट्विंकलनेही उपरोधिक ट्विट करत आणि नाव न घेता पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. 


गेल्या काही दिवसांपासून बरीच धार्मिक छायाचित्र पाहिल्यानंतर आता मी, एक नवी कार्यशाळा सुरू करणार आहे ‘Meditation Photography-Poses and Angles’, असं तिने या ट्विटमध्ये लिहिलं. वेडिंग फोटोग्राफीनंतर हीच पुढची सर्वात मोठी गोष्ट असणार आहे, असं म्हणज ध्यानधारणेच्या फोटोग्राफीचा ट्रेंड येणार असल्याचा उपरोधिक टोला तिने लगावला. 



'मिसेस. फनी बोन्स' या ट्विटर हँडलवरुन ट्विट करणाऱ्या ट्विंकलने पंतप्रधानांवर निशाणा साधण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा मोदींच्या ज्या भूमिका आपल्याला खटकल्या, त्या भूमिकांवर ट्विंकलने वेळोवेळी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं होतं. किंबहुना तिच्या या प्रतिक्रियांविषयी आणि ट्विटविषयीची खुद्द पंतप्रधानांनाही कल्पना असल्याचं त्यांनीच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. माझ्यामुळे तुमच्यात कौटुंबीक कलह कमीच असेल, असं पंतप्रधान मोठ्या विनोदी अंदाजात खिलाडी कुमारला दिलेल्या अराजकीय मुलाखतीत म्हणाले होते.