आलिया म्हणाली रणबीरला `आय लव्ह यू`...
आलियाने संपूर्ण जगा समोर आपल्या नात्याचा स्वीकार केला आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यातले नाते दिवसोंदिवस बहरत चालले आहे. तर आलियाने संपूर्ण जगा समोर आपल्या नात्याचा स्वीकार केला आहे. 64 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या वेळेस आलिया रणबीरला 'आय लव्ह यू' म्हणाली आहे. शनिवारी पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आलियाला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 'राझी' चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे आलिया सध्या तिच्या 'कलंक' चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे.
फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये जेव्हा आलिया पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आली तेव्हा रणबीर आपल्यासाठी खास असल्याचे वक्तव्य तिने केले. तिच्या खास वक्तव्या नंतर रणबीरच्या तोंडावर स्मित हास्य उमटले. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
त्याचप्रमाणे रणबीरची आई नितू यांनी स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन रणबीर - आलियाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांच्या हातात पुरस्कार असल्याचे दिसत आहे आणि त्यांनी कॅप्शनमध्ये 'असे महत्वाचे क्षण फार महत्वाचे असतात. अशा क्षणांमूळे मनातील तणाव कमी होतो' असे म्हंटले आहे.
वर्षाखेरीस आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटात आलिया - रणबीरची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी साखपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.