मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनला 'पुष्पा' या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. चित्रपटानं चांगली कामगिरी केली आणि सगळ्यांची चांगलीच पसंती मिळाली. चित्रपटाच्या कथेसोबतच गाण्याची हूक स्टेप देखील चांगलीच प्रसिद्ध झाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी एका पूजेचेही आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पहिल्या चित्रपटाचं नाव 'पुष्पा : द राईज' तर दुसऱ्या भागाचं नाव 'पुष्पा : द रुल' असं असेल. पुढील वर्षी जानेवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती सोशल मीडियावरील पोस्टवरून समोर येत आहे. आता एकिकडे आपण या चित्रपटाबद्दल उत्सुकतेनं प्रतिक्षा करत आहोत, दुसरीकडे दुसऱ्या भागाच्या स्टारकास्टबद्दल विविध बातम्या समोर येत आहेत.


आणखी वाचा : मानधनाच्या बाबतीत 'हा' दाक्षिणात्य अभिनेता रणबीर, रणवीरलाही टाकतोय मागे, आकडा एकदा पाहाच...



अल्लू अर्जुन या चित्रपटासाठी 125 कोटी घेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर सुकुमार यासाठी 50 कोटी घेत आहे आणि अभिनेत्री रश्मिता मंदाना चित्रपटासाठी 5 कोटी रुपये घेत आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यात फक्त भारतात नाही तर परदेशातही प्रदर्शित होणार आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात 'पुष्पा 2' चं शूटिंग सुरू करू शकतो. काही वेळानं रश्मिका देखील चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 'पुष्पा द राइज'  21 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जननं तर खळबळ उडवून दिली होतीच, शिवाय हिंदीतही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.


दरम्यान, आता पर्यंत सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान होता. शाहरुखनं पठान या चित्रपटासाठी 100 कोटी मानधन म्हणून घेतले होते. तर अल्लू अर्जुननं 125 कोटी मानधन घेतं किंग खानलाही मागे टाकलं आहे.