दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनविरोधात (Allu Arjun) हैदराबाद पोलीस (Hyderabad Police) गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. अल्लू अर्जुन त्याच्या "पुष्पा 2: द रुल" या चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता आला होता. यानंतर हैदराबादमधील थिएटरबाहेर झालेली चेंगराचेंगरी आणि एका महिलेचा मृत्यू यानिमित्ताने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्लू अर्जूनसह संध्या चित्रपटाच्या व्यवस्थापनाविरोधातही गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत अतिरिक्त तरतुदी न करण्यात आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. याप्रकरणी अल्लू अर्जून किंवा चित्रपटगृह मालकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


एका निवेदनात हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद म्हणाले की, "चित्रपटगृह व्यवस्थापन किंवा कलाकारांच्या टीमकडून ते थिएटरला भेट देणार असल्याची कोणतीही सूचना नव्हती. चित्रपटगृह व्यवस्थापनाला त्यांच्या आगमनाची माहिती असतानाही अभिनेता आणि त्याच्या टीमसाठी प्रवेश कऱण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली नव्हती".


पोलिसांनी सांगितले की, मोठा जमाव पुढे आल्याने थिएटरचे मुख्य गेट कोसळले. ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न करूनही चेंगराचेंगरी जीवघेणी ठरली. रेवती असं मृत महिलेचं नाव असून तिच्या मुलाचं नाव तेजा असे आहे. तेजाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचं समजत आहे. 


पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "थिएटरच्या आत गोंधळलेल्या परिस्थिती निर्माण होण्यासाठी आणि त्यामुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल  जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल," असं पोलिसांनी सांगितलं आहे.