`आमच्या पप्पांनी गणपती` फेम बालकलाकार झळकणार मालिकेत, पहिला प्रोमो आला समोर
. बालकलाकार असलेल्या साईराज हा एका मालिकेत एंट्री करणार आहे. याचा एक प्रोमोही समोर आला आहे.
Sairaj Kendre In Appi Amchi Collector Serial : ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं गणपतीत प्रचंड व्हायरल झालं होतं. बालकलाकार साईराज केंद्रेने या गाण्यावर केलेल्या एका रीलमुळे हे गाण सुपरहिट ठरलं. साईराजचे मोहक हावभाव आणि गोंडस अभिनयामुळे तो रातोरात प्रसिद्धीझोतात आला. आता साईराजचे नशीब पालटले आहे. बालकलाकार असलेल्या साईराज हा एका मालिकेत एंट्री करणार आहे. याचा एक प्रोमोही समोर आला आहे.
झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका सध्या एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. याच मालिकेत आता बालकलाकार साईराज केंद्रेने एंट्री घेतली आहे. साईराज हा या मालिकेत अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोलचे पात्र साकारणार आहे. नुकतंच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत अप्पी अर्जुनला वचन देते की, ती त्यांच्या मुलाला वडिलांबद्दल कधीच काही सांगणार नाही. यानंतर अप्पी आणि तिचा चिमुकला लेक मंदिरात जातात. यावेळी दर्शन घेऊन अप्पी अमोलला सांगते, “तू इथेच उभा राहा मी प्रदक्षिणा मारते” तेवढ्यात या मंदिरात दर्शन घेण्यासाठी अर्जुन येतो आणि तो त्याला खांद्यावर घेऊन मंदिरातील घंटा वाजवताना दिसतो. तर अप्पी ही मंदिराच्या बाहेर प्रदक्षिणा मारत आहे.
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत प्रेक्षकांना सात वर्षांचा लीप आला आहे. त्यामुळे आता अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोल हा मोठा झाला आहे. अप्पीने मुलाला वडिलांपासून दूर ठेवण्याचं वचन निभावलं पण, या छोट्या पावलांनी बाबांना शोधलं…आता सात वर्षांपूर्वी तुटलेली नाती, मालिकेत जोडली जातील का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
साईराज केंद्रे याने इन्स्टाग्रामवर याचा प्रोमो शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी प्रेक्षकांना मालिका पाहण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या लाडक्या साईराज ची पहिली सिरीयल येत आहे .....तर पाहायला विसरू नका आपल्या अमोल ला (सिंबाला) 1 मे पासून रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठी वर, असे कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे.
दरम्यान साईराज हा मालिकेत एंट्री करत असल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचा गोंडस अंदाजाने त्याने आधीच सर्वांची मने जिंकली आहेत. आता तो मालिकेत झळकणार असल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव पाहायला मिळत आहे.