मुंबई : #MeToo ही मोहिम गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात चांगलीच जोर धरु लागली आहे. लैंगिक शोषणाविरोधात आवाज उचलत प्रत्येकानेच अन्यायाविरोधात एल्गार पुकारला आहे. ज्यांना अनेकांचा पाठिंबाही मिळाला आहे. पण, एका अभिनेत्रीने मात्र हे सारंकाही वैतागवाणं असल्याचं म्हणत सर्वांचच लक्ष वेधलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला या मोहिमेविषयी होणाऱ्या चर्चा आता मर्यादा ओलांडत असल्याचं मत मांडणारी ती अभिनेत्री आहे, पॅमेला अँडरसन. 


स्त्रीवाद हा कायम सुरुच राहणार आहे, ही बाब अधोरेखित करत पॅमेला म्हणाली, 'मी स्वत: स्त्रीवादी आहे. पण, सध्याच्या घडीला या साऱ्यात आलेली ही लाट पाहता हे सारंकाही अतिशय वैतागवाणं आहे.' 


#MeToo मध्ये येणारी वळणं पाहता तिने या साऱ्याची तुलना एखाद्या अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीशी केली आहे. आपल्या या वक्तव्यासाठी अनेकांचा रोषही ओढावला जाण्याची तिला कल्पना आहे. असं असलं तरीही पॅमेलाने तिलं ठाम मत मांडत E!Online ला आपली प्रतिक्रिया दिली. 


दर दिवशी होणाऱ्या चर्चा, त्यातून डोकं वर काढणारे वाद  आणि त्यानंतर आणखी वेगळ्या चर्चा हे सत्र बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. असं असलं तरीही #MeToo ला मिळणारा प्रतिसाद आणि आता पॅमेलाचं वक्तव्य पाहता येत्या काळात या प्रकरणाला काही नवं वळण मिळतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.