मुंबई : 'फास्टर फेणे' फेम अभिनेता अमेय वाघ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे तो त्याच्या आणि त्याच्या 'गर्लफ्रेंड'च्या चर्चांमुळे... छोट्या पडद्यावर 'झी मराठी'वरील 'दिल दोस्ती दुनियादारी'मधून प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरल्यानंतर अमेयनं मोठ्या पडद्यावरही जबरदस्त सुरुवात केली. आपल्या खाजगी आयुष्यात जवळपास वर्षभरापूर्वी विवाहबंधनात अडकलेला अमेय आता 'गर्लफ्रेंड'च्या चर्चा का करतोय? असाही प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला. आता खुद्द अमेयनंच या प्रश्नांना उत्तर तर दिलंय मात्र त्या उत्तरातला सस्पेन्सही त्यानं कायम राखलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघने जरा मदत हवीये तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज! असे आवाहन केले होते. आता ही मुलगी कोण? आणि अमेय गुडन्यूज देणार का? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात घोळू लागले.



त्यानंतर या प्रश्नांची उत्तरं मिळण्याआधीच 'दम असेल तर गर्लफ्रेंडचं नाव सांगा!' अशी पोस्ट अमेयनं केली. या दोन्ही पोस्टमुळे अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत होते. मात्र या पोस्टचा अमेयच्या खाजगी आयुष्याशी काही संबंध नसून या सर्व पोस्ट आगामी चित्रपटासंबधी असल्याचं त्यानं स्पष्ट केलंय. 




अमेयच्या आगामी चित्रपटाचे नाव 'गर्लफ्रेंड' असल्याचं त्यानं उघड केलंय. या चित्रपटात अमेय नचिकेत प्रधान नावाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, नचिकेतची 'गर्लफ्रेंड' कोण असेल? याचं गूढ मात्र अमेयनं कायम ठेवलंय.    




अमेयने यापूर्वी 'मुरांबा'मध्ये मिथिला पालकर आणि 'फास्टर फेणे'मध्ये पर्ण पेठे या दोन हरहुन्नरी अभिनेत्रींसोबत काम केले आहे, आता त्याची नवी 'गर्लफ्रेंड' कोण असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. औत्सुक्याचा विषय ठरला आहे.


'गर्लफ्रेंड' या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे, त्यांनी यापूर्वी 'टाइम प्लीज', 'डबल सीट', 'मुरांबा', 'वायझेड' या चित्रपटांची निर्मिती केली आहे.