मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव महाविकासआघाडीकडून एकमताने पुढे करण्यात आलं. ज्यानंतर गुरुवारी त्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळत आहे. त्यामुळे हा क्षण अनेकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. या दिमाखदार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. ज्यामध्ये कलावर्तुळातील काही प्रसिद्ध चेहरेसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार हिंदी कलाविश्वाचे महानायक अमिताभ बच्चन, परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान, धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना निमंत्रण पाठवल्याचं कळत आहे. 


कलाविश्वात ठाकरे कुटुंबाचा वावर आणि अनेक सेलिब्रिटी, उद्योजकांशी असणारे त्यांचे घनिष्ट संबंध पाहता राजकीय नेतेमंडळींसोबतच बी- टाऊन सेलिब्रिटींपैकी कोण या सोहळ्याला हजर राहतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


पवार कुटुंबात फूट पडू नये यासाठी 'दोन' व्यक्तींची महत्त्वाची भूमिका



मुंबईतील शिवाजी पार्क, येथे उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ज्यासाठी सुरक्षेपासून ते भव्य सेटपर्यंत सर्वच तयारीची लगबग सुरु आहे. महाराष्ट्रविकासआघाडीचे सर्व नेते जातीने व्यवस्था पाहत आहेत. तर, या सोहळ्यासाठी शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाची आठवण करुन देणारा भव्य सेट साकारण्याची जबाबदारी लोकप्रिय कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी घेतली आहे. एकंदरच हा सोहळा अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा असेल हे खरं.