पवार कुटुंबात फूट पडू नये यासाठी 'दोन' व्यक्तींची महत्त्वाची भूमिका

कुटुंबात राजकारण नको.... 

Updated: Nov 26, 2019, 04:24 PM IST
पवार कुटुंबात फूट पडू नये यासाठी 'दोन' व्यक्तींची महत्त्वाची भूमिका title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाविकासआघाडीच्या साथीने एकिकडे सत्तास्थापनेसाठीच्या बैठका आणि चर्चा सुरु असताना, रातोरात अजित पवार यांनी बंड करत भाजप सरकारला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा बसला. 

अजित पवारांनी बंड केल्याचं कळताच शरद पवार यांनी स्पष्टपणे हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचं सांगत पक्षाचा त्यांना पाठिंबा नाही हे स्पष्ट केलं. पवार कुटुंबातील मंडळींनी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबातील या व्यक्तीला परत आणण्यासाठीचे सर्वच प्रयत्न केले. मुळात पवारांच्या साथीने गेलेले आमदार तातडीने शरद पवारांकडे परतले, माध्यमांपुढे हजरही झाले. पण, अजित पवार यांची मनधरणी ना सुप्रिया सुळे यांचे अश्रू, व्हॉट्सअप स्टेटस करु शकले. ना, आदरपूर्वकपणे त्यांना परतण्याचं आवाहन करणाऱ्या रोहित पवारांचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला. 

'प्रयत्नांती अजित पवार...' असं चित्र मात्र राष्ट्रवादीच्या बाबतीत मंगळवारी पाहायला मिळालं. पवार कुटुंबातीलच दोन अतीव महत्त्वाच्या व्यक्तींनी कुटुंबात ही फूट पडू दिली नाही, अशा चर्चांनी सध्या जोर धरला आहे. या व्यक्ती म्हणजे सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे आणि प्रतिभा पवार. अजित पवार आणि प्रतिभा पवार यांचं एक खास नातं. त्याच नात्याने यावेळी राजकारणाच्या पटलावर नात्यांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचं सिद्ध केलं. 

मंगळवारी सत्ताकारण तापत असतानाच मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये जात सदानंद सुळे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच राजकीय गरमागरमीत प्रतिभा पवार यांच्याखातर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं जात आहे. 

राजकारणातील नात्यांची ही खेळी म्हणा किंवा नात्यांचे बंध म्हणा 'तीर निशाने पे लगा है', हे मात्र तितकंच खरं. एकेकाळी सुप्रिया सुळे निवडणुकीला उभ्या असताना त्या बिनविरोध निवडून याव्यात यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना हमी दिली होती. त्याच धर्तीवर आज बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे राजकारणाच्या या रिंगणात एकटे पडताना दिसत असतानाच त्याचा आधार होण्याचा आग्रह खुद्द प्रतिभा पवार यांनी धरल्याचंही म्हटलं जात आहे. परिणामी शिवसेनेच्या पाठीशी शरद पवार खंबीरपणे उभे राहिले आणि महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा एकदा बहुमत, निवडणुका, मतभेद, मनधरणी यांच्यासमवेत नात्यांच्या बळावरही लढलं गेलं असं म्हणायला हरकत नाही.