Amitabh Bachchan buys land in Alibaug : अरबी समुद्र आणि त्याच्या किनारपट्टी भागावर वसलेल्या अलिबागच्या समृद्ध भूमीवर सध्या अनेक सेलिब्रिटी मंडळींचा वावर दिसू लागला आहे. सुरूवातीला शाहरुख आणि त्यामागोमाग काही राजकीय नेतेमंडळींनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्यानंतर त्यामागोमाग आता हिंदी कलाजगताचे महानायक अमिताभ बच्चनसुद्धा अलिबागकर झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनीसुद्धा या किनारपट्टी क्षेत्रामध्ये भूखंड खरेदी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागमध्ये बिग बींनी नुकतीच 10 हजार चौरस फुटांच्या भूखंडाची खरेदी केली. House of Abhinandan Lodha (HoABL) यांच्या ताब्यात असणाऱ्या या भूखंडाच्या खरेदीसाठी बच्चन यांनी 10 कोटी रुपये इतकी किंमत मोजली. साधारण आठवडाभरापूर्वीच या व्यवहाराची नोंद करण्यात आली. 


प्राथमिक माहितीनुसार  A Alibaug नावाच्या एका मोठ्या प्रकल्पामध्ये  बच्चन यांनी ही गुंतवणूक केली असून मागील वर्षी एप्रिल महिन्यात या 20 एकरांच्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, सदर विकासकांकडून भूखंड खरेदीची बिग बींची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा त्यांनी अयोध्येतील राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी The Sarayu या शरयू नदीच्या किनाऱ्याला लागून असणाऱ्या 7 Star प्लॉटेड प्रकल्पामध्ये 14.5 कोटी रुपयांमध्ये भूखंड खरेदी केला होता. 


हेसुद्धा वाचा : मोठी बातमी! Paternity Leave संदर्भातील राज्य सरकारचा 'तो' आदेश रद्द


अलिबाग, वर्सोली, किहीम, मांडवा, रेवस, थळ अशा गावांना लाभलेल्या किनारपट्टीमुळं अलिबागमध्ये भूखंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. मागील काही वर्षांमध्ये इथं मोठ्या प्रमाणात सोयीसुविधांची उपलब्धताही झाल्यामुळं हा भाग धनाढ्य मंडळींच्याही पसंतीस उतरू लगाला आहे. विराट कोहलीपासून, दीपिका- रणवीर, सुहाना खान या आणि अशा कैक सेलिब्रिटी मंडळींची इथं भूखंड खरेदी करण्यासाठीची पसंती पाहता हीच बाब लक्षात येत आहे. दरम्यान, बिग बींनी घेतलेला हा भूखंड नेमका कुठं आहे यासंदर्भातील सविस्तर वृत्त अद्याप हाती आलेलं नाही.