मुंबई : बॉलिवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री ट्विटरवरून वोडाफोनबद्दल नाराजी व्यक्त केली. वोडाफोन.... काहीही चालत नाही..सर्व संदेश अपयशी होत आहेत. तुम्ही फोर जी म्हणताय पण नथिंग इज गोईंग जी असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी आपली नाराजी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे मध्यरात्री अमिताभ ''102 नॉटआऊट'' या सिनेमासाठी एका गाण्याचं रेकॉर्डिंग संपवून मोबाईलवर संदेश पाठवत होते. मात्र वोडाफोनचं नेटवर्क चालत नसल्यामुळे अमिताभ यांनी संताप व्यक्त केला.



सुरुवातीला त्यांनी नाव न घेता मोबाईल कॅरियर जागृत व्हा... काहीही चालत नाही असं ट्विट रात्री एक च्या आसपास टाकलं. त्यानंतर एक तासांनी त्यांनी वोडाफोनचं नाव घेत नाराजी व्यक्त केली.



याआधीही अमिताभ यांनी वोडाफोनच्या नेटवर्कबाबत अनेकदा सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अमिताभ यांनी केलेल्या नाराजीबाबत पुढच्या पाचव्या मिनिटाला वोडाफोनने याची दखल घेतल्यामुळे नंतर त्यांनी गंमतीशीर ट्विट केलं...चलो...सून ली..सून ली वोडाफोनने हमारी सून ली.... आता संदेश जात आहेत. असं म्हणत नेटवर्क सुरु झाल्याचंही त्यांनी ट्विट केलं.



विशेष म्हणजे वोडाफोनचे असे अनेक सर्वसामान्य ग्राहक आहेत जे नेटवर्कमुळे अनेकदा हैराण होतात. अमिताभच्या ट्विटची तातडीने दखल घेतल्यानंतर आता सर्वसामान्य ग्राहकही मनात नक्कीच विचार करत असेल...काश हम भी अमिताभ होते.