कोची : बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन यांनी वडिल हरिवंश राय बच्चन यांनी 'बच्चन' हे आडनाव का स्वीकारले याबाबत खुलासा केला आहे. जात-पात याबाबत असलेल्या रूढी-परंपरांना मोडीत काढण्यासाठी त्यांनी बच्चन हे आडनाव स्वीकारलं असल्याचं बिग बींनी सांगितलं. कोची येथील आंतराष्ट्रीय जाहीरात संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 'माझ्या वडिलांचं नाव हरिवंश राय श्रीवास्तव होतं. भारतात आडनावावरून जात ओळखली जाण्याची प्रथा आहे. आडनावावरून हा ब्राम्हण, हा क्षत्रिय, हा दलित अशी नावं त्या व्यक्तीला दिली जातात. माझ्या वडिलांनी या प्रथेला नष्ट करण्यासाठी श्रीवास्तव हे नाव काढून त्याजागी बच्चन आडनाव स्वीकारलं' असल्याचं बिग बींनी यावेळी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आडनावावरून जात ओळखली जाऊ नये म्हणून माझ्या वडिलांनी आपल्या नावातून श्रीवास्तव नाव काढून हरिवंश राय बच्चन असं केलं. आता बच्चन हेच संपूर्ण कुटुंबाचं आडनाव झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. माझे वडिल जात-पात, रूढी-परंपरा याच्या विरोधात होते. जात ओळखली जाऊ नये म्हणूनच त्यांनी नाव बदलून घेतलं. मी वडिलांची हिच परंपरा पुढे घेऊन जात आहे. मला माझ्या बच्चन नावाचा अभिमान असल्याचंही' त्यांनी सांगितलं.


कोची येथील कार्यक्रमावेळी बिग बींनी त्यांच्या जाहीरात क्षेत्रातील कामाबद्दलही चर्चा केली. 'मी व्यावसायिक जाहीराती केल्या असून त्यासोबतच पोलियो निवारण आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या सामाजिक अभियानासाठी जाहीराती केल्या आहेत. मी दारू, तंबाकू यांसारख्या उत्पादनांच्या जाहीरात कधीच केल्या नसल्याचं' त्यांनी सांगितलं. 


अमिताभ बच्चन यांना १५ फेब्रुवारीला हिंदी सिनेसृष्टीत ५० वर्षे पूर्ण झाली. अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली 'सात हिंदुस्तानी' चित्रपटातून त्यांच्या करियरची सुरूवात केली होती. त्यानंतर १९७१ साली अभिनेते राजेश खन्ना आणि ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'आनंद' चित्रपटात अमिताभ यांनी साइड हिरोची प्रमुख भूमिका साकारली होती. १९७३ साली 'जंजीर'मधून साकारलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. आणि ती आजही कायम आहे. त्यानंतर सुरू झालेल्या महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेसृष्टीतील न थांबणाऱ्या प्रवासाने यशाची ५० वर्ष पूर्ण केली आहेत.