रश्मी देसाईचा बॉयफ्रेंड अरहान खान... अमृता धनोआ आणि सेक्स रॅकेट
सेक्स रॅकेटमध्ये अरहानचाही हात असल्याचा आरोप अमृता धनोआनं केलाय
मुंबई : मुंबई पोलिसांनी शुक्रवारी गोरेगावच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत ३२ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री अमृता धनोआ (Amrita Dhanoa) हिला अटक केली. अमृतासोबत ऋचा सिंह (२६ वर्ष) नावाच्या एका मॉडेललाही या प्रकरणात अटक झालीय. 'अनलिमिटेड नशा', 'परवीन बॉबी' आणि 'द वर्ल्ड ऑफ फॅशन' अशा सिनेमांत ती दिसली होती. छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) हिचा बॉयफ्रेंड अरहान खान (Arhan Khan) याच्यावर केलेल्या फसवणुकीच्या आरोपांमुळे अमृता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आताही सेक्स रॅकेटमध्ये फसल्यानंतर अमृतानं अरहाननं आपल्याला यात अडकावल्याचं म्हटलंय. या सेक्स रॅकेटमध्ये अरहानचाही हात असल्याचा आरोप अमृतानं केलाय.
अरहान खाननं फेटाळले आरोप
तर अरहान खाननं मात्र अमृताचे आरोप फेटाळून लावलेत. अमृता धनोआ नावाच्या कोणत्याही मुलीला आपण ओळखतच नसल्याचं अरहानचं म्हणणं आहे. मी तिला कधी भेटलोही नाही. ही मुलगी माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
त्या मुलीशी माझा काहीही संबंध असता तर तिच्याकडे माझे फोटो, कॉल डिटेल्स किंवा रेकॉर्डिंग किंवा इतर काही पुरावा असता. ती हे केवळ प्रसिद्धीसाठी करतेय. केवळ बातम्यांत येण्यासाठी ती माझ्यावर आरोप करतेय, असं अरहाननं म्हटलंय.
एका रिऍलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या अरहान खानसोबत आपण संबंधात असल्याचंही अमृतानं स्पष्ट केलं होतं. २००६ ते २०१० अशी पाच वर्ष अमृता - अरहान एकमेकांसोबत लिव्ह इनमध्ये राहत होते. अरहाननं आपल्याकडून ५ लाख रुपये घेतले होते ते अद्याप परत केले नाहीत, असा दावा अमृतानं नुकताच केला होता. त्यावेळी अरहान 'बढो बहू' नावाच्या कार्यक्रमात काम करत होता. सध्या अरहान अभिनेत्री रश्मी देसाई हिच्यासोबत संबंधात आहे. अरहानला एक मुलगाही आहे हेदेखील रिऍलिटी शो दरम्यान रश्मीसमोर उघड झालं होतं. त्यानंतर तिला मोठा धक्काही बसला होता.