मुंबई : रविवारी दुपारच्या सुमारास अभिनेता sushant singh rajput  सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, अशा बातम्या सुरु झाल्या आणि अनेकांनाच धक्का बसला. जवळपास तासभर तर, याची खातरजमा करुन घेण्यासाठीच वेळ देण्यात आला. अखेर कितीही नाकारलं तरीही सुशांतने वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आत्महत्या केल्याचं हे धक्कादायक वृत्त अनेकांनीच पचवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाविश्वापासून ते अगदी चाहत्यांच्या वर्तुळापर्यंत प्रत्येकालाच सुशांतच्या एक्झिटने हादरा दिला. त्याच्या जाण्यानं असंख्य प्रश्न उपस्थित झाले, काही अनेक मुद्दे समोर आले ज्याची उत्तरं कदाचित सुशांतच अधिक चांगल्या पद्धतीनं देऊ शकला असता. आपल्या कलेच्या बळावर आव्हानात्मक भूमिकांचं ओझं पेलणारा हा अभिनेता आता आपल्याच नसला तरीही त्याने एकदा तरी परतावं, अशीच विनवणी चाहत्यांकडून केली जात असतानाच अमूलनंही या सूरात सूर मिसळला. 


वाचा : सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीतील प्रस्थापितांवर कंगनाचा खळबळजनक आरोप 


महत्त्वाच्या प्रसंगांवर कायमच कार्टूनच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या अमूलकडून यावेळी सुशांतसाठी एक खास आर्जवी सूर असणारं कार्टून साकारण्यात आलं. 'इक वारी फिरसे आ भी जा यारा', असं लिहिलेलं हे कार्टून पाहता नकळतच डोळ्यांच्या कडा पाणावत आहेत. 



कृष्णधवल रंगाच्या या कार्टूनमध्ये सुशांतनं साकारलेल्या काही भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. रुपेरी पडद्यावर त्यानं साकारलेला माही म्हणजेच भारतीय क्रिकेट वर्तुळातील धडाडीचा खेळाडू महेंद्रसिंह धोनी याची व्यक्तिरेखा विसर न पड्याजोगीच. याच भूमिकेलाही अमूलच्या या कार्टूनमध्ये स्थान देण्यात आलं आहे.


 


अतिशय बोलकं असं हे कार्टून पाहता सुशांत आपल्यात नसल्याचीच भावना मनात वारंवार कालवाकालव करुन जात आहे. अर्थात त्यानं ही अनपेक्षित एक्झिट घेतली असली तरीही त्या मन जिंकणाऱ्या स्मितहास्यासह समोर उभा ठाकणारा सुशांत आणि त्याच्या या भूमिका कायमच प्रेक्षांमध्ये राहतील हेसुद्धा तितकंच खरं.