सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीतील प्रस्थापितांवर कंगनाचा खळबळजनक आरोप

... तिच्या संतापाचा बांध फुटला  

Updated: Jun 15, 2020, 04:55 PM IST
सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीतील प्रस्थापितांवर कंगनाचा खळबळजनक आरोप title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : झगमगणाऱ्या कलाविश्वात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या त्यानंतर काही प्रमाणात अपयशाचाही सामना करणाऱ्या  sushant singh rajpoot सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्यानं रविवारी आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतनं उचललेलं हे पाऊल मनाला चटका लावण्यासोबतच या चित्रपट विश्वाची एक नकारात्मक बाजूही सर्वांसमोर ठेवून गेला. 

सुशांतच्या आत्महत्येनं त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी समोर आणल्या. त्यासोबतच अभिनेत्री कंगना रानौत हिनं मात्र सुशांतच्या आत्महत्येनंतर आपल्याला जबर धक्का बसल्याचं सांगत चित्रपट वर्तुळातील घराणेशाहीच्या सिंहासनावर बसणाऱ्या काही प्रस्थापितांवर या आत्महत्येचा आरोप केला आहे. 

अतिशय संतप्त स्वरात करण जोहर आणि सेलिब्रिटी वर्तुळातील या परंपरागत घराणेशाहीच्या साखळीची विळखा नेमका कसा घट्ट होत गेला हे kangana ranaut कंगनानं अत्यंत संतप्त स्वरांत सर्वांपुढे ठेवलं. सोबतच तिनं असे काही प्रश्न उपस्थित केले ज्याचा विचार येत्या काळात वारंवार केला जाणार आहे. 

ही आत्महत्या नाही, हत्या आहे.... असं म्हणत कंगनानं तिचं मत मांडत पुन्हा एकदा बॉलिवूडमधील या प्रस्थापितांना निशाण्यावर घेतलं. 

वाचा : ....ते मला बॉलिवूडमधून बाहेर फेकतील; सुशांतला होती धास्ती 

 

कंगना नेमकं काय म्हणाली? 

सुशांतच्या आत्महत्येनं सर्वांनाच धक्का बसला आहे. पण, काही जण याकडे असं पाहत आहेत की ज्यांचं मानसिक खच्चीकरण झाले आहेत ते आत्महत्या करतात वगैरे. ज्या मुलानं इंजिनिअरिंगमध्ये अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन दाखवलं आहे. जो अग्रस्थानी असणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आहे, त्याची बैद्धिक पातळी कमी कशी असू शकेल? तुम्ही पाहा त्याच्या अखेरच्या काही सोशल मीडिया पोस्ट. तो स्पष्टपणे सांगत आहे, आपला चित्रपट पाहण्यासाठी या अशी याचना तो करत आहे. माझा कोणी गॉडफादर नाही, मला फेकून दिलं जाईल या कलाविश्वातून असं तो सांगत आहे. मला या कलाविश्वात बाहेरच्या व्यक्तीप्रमाणं वाटतं, असं त्यानं मुलाखतींमध्येही म्हटलं आहे. मग या सर्व घटना तथ्यहीन आहेत का? 

सुशांतच्या पदार्पणाच्या चित्रपटालाही पुरस्कार न मिळण्यावर तिनं प्रश्नचिन्ह उपस्थित करत रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणाऱ्या 'गली बॉय' सारख्या वाहियात चित्रपटाला पुरस्कार मिळतो.... असं म्हणत तिनं अतिशय संतप्त स्वरांत आपली भूमिका मांडली. 

आम्हाला तुमचं काही नको, असं प्रस्थापितांना उद्देशून म्हणत किमान आम्हाला आमच्या कामाची पोचपावती तरी द्या असा आर्जवी सूरही तिनं आळवला. कलाकार कठीण परिस्थितीमध्ये असताना अनेकदा तुझा वाईट काळ आहे, त्यावर कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नकोस असं अनेकदा अनेकांकडून सांगण्यात येतं, हा खळबळजनक खुलासा करत हे असले विचार का आमच्या मनात भरवले जातात असा उदविग्न सवाल तिनं उपस्थित केला.

वाचा : सुशांतचे आत्महत्येपूर्वीचे १२ तास आणि 'ते' ४ फोन क़ॉल 

कंगनानं मांडलेले हे प्रश्न आणि तिनं केलेले खळबळजनक खुलासे पाहता दिसतं तसं नसतं यावर पुन्हा एकदा विश्वास बसत आहे. मुळात, घराणेशाही आणि गटबाजीच्या या बातावरणात सुशांतचा निष्पाप बळी पडला याचीच खंत अनेकांना कायम राहील हे वास्तव मात्र आता बदलता येणार नाही.