खळबळजनक! `पीआर एजेन्सीकडून सेलिब्रिटींना पुरवले जातात Fake Followers`
आतापर्यंत क्राईम ब्रांचने जवळपास 68 अशा कंपन्यांची माहिती गोळा केली आहे.
मुंबई: सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असणाऱ्या फेक फॉलोअर्सचं प्रकरण आता चांगलंच तापताना दिसत आहे. त्यातच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही सूचक विधान करत पीआर एजेन्सी अर्थात सेलिब्रिटींच्या जनसंपर्क करणाऱ्या काही कंपन्यांना निशाण्यावर घेतलं आहे.
काही पीआर एजेन्सी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि काही बड्या हस्तींना फेक सोशल मीडिया फॉरोअर्स म्हणजेच bots मिळवून देतात, असं देशमुख म्हणाले. या फेक फॉलोअर्सचा वापर सोशल मीडिया ट्रोलिंग, सोशल मीडियावरील माहितीची चोरी अशा कामांसाठी केला जात असल्याचंही ते शुक्रवारी म्हणाले. शिवाय महाराष्ट्र पोलीस सध्या याप्रकरणी लक्ष घालत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात १८ जणांची लोकांची चौकशी करण्यात आली आहे. ज्यापैकी अनेकजण हे बॉलिवुड किंवा टेलिव्हीजन क्षेत्रातील आहे. यामध्ये निर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्री याशिवाय मेकअप आर्टिस्ट, कोरियोग्राफर, असिस्ंटट डायरेक्टर यांचाही समावेश आहे. यासोबतच मुंबई क्राईम ब्रांचने फ्रांन्स सरकारला एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये followerscart.com या वेबसाईटशी संबंधित लोकांची माहिती मागवण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत क्राईम ब्रांचने जवळपास 68 अशा कंपन्यांची माहिती गोळा केली आहे. ज्या फेक सोशल मीडिया फॉलोअर्सचं रॅकेट चालवतात. पोलिसांनी या प्रकरणात आधीच अभिषेक नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.