मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का, या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाला...
बॉलिवूडचा अभिनेता अनिल कपूरने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
मुंबई - बॉलिवूडचा अभिनेता अनिल कपूरने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी यांना भेटण्याची खूप दिवसांपासून आपली इच्छा होती. पण शक्य होत नव्हते. शेवटी ही भेट घडून आलीच. ही भेट प्रेरणादायी होती, असेही त्याने म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांचे व्यक्तित्त्व खूप प्रेरणादायक आहे. देशासाठी एवढी मेहनत घेतलेल्या व्यक्तीशी पहिल्यांदाच माझी भेट झाल्याचे अनिल कपूरने म्हटले आहे. अनिल कपूर याचा 'टोटल धमाल' सिनेमा लवकरच प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमानिमित्त अनिल कपूर आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली.
मोदी यांच्या भेटीमुळे अनिल कपूर भारावून गेला होता. तो म्हणाला, नरेंद्र मोदींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्यच समजतो. त्यांना भेटून मलाच सन्मानित झाल्यासारखे वाटते आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मला त्यांना भेटण्याची इच्छा होती. पण ते शक्य झाले नाही. पण आता ते शक्य झाले. काही भेटी अशा असतात की त्या तुमच्या नशिबातच लिहिलेल्या असतात. त्यामुळेच मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांना भेटून मला सन्मानित झाल्यासारखे वाटते आहे. ही भेट खूपच प्रेरणादायी होती. ते देशासाठी खूप मेहनत घेत आहेत.
नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत का, या प्रश्नावर उत्तर देताना अनिल कपूर म्हणाला, पुढच्या लोकसभा निवडणुकीत काय होते हे पाहणे प्रत्येकासाठी उत्सुकतेचे आहे. निकाल काय लागतात हे पाहावे लागेल. पण सध्या मनोरंजनाच्या व्यासपीठावरून लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे अनिल कपूर याने सांगितले.
टोटल धमाल या सिनेमाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे. सिनेमामध्ये अनिल कपूरसोबत, अभिनेता अजय देवगण, माधुरी दीक्षित, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जॉनी लीवर, बोमन इरानी आणि संजय मिश्रा यांच्यासह इतरही कलाकार दिसणार आहेत.